Panshet Drowning : मित्रांसोबतची सहल ठरली अखेरची! पानशेत धरणाच्या कॅनॉलमध्ये बुडून तरुणाचा दुर्दैवी अंत
Panshet Drowning : कोंढवा खुर्द येथील सहा मित्र पर्यटनासाठी आले असताना दुर्दैवी घटना; अंकुश चौधरी या २२ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू.

Panshet Drowning – मित्रांसोबत पर्यटनासाठी आलेल्या पुण्यातील एका २२ वर्षीय तरुणाचा पानशेत धरणाच्या कॅनॉलमध्ये पोहताना पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. २५) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. अंकुश मनोज चौधरी (वय २२, रा. कोंढवा खुर्द, पुणे) असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कोंढवा खुर्द भागातील सत्यम संतोष झा (वय २२),
अभिषेक पांडे, आदर्श पांडे, गौरव प्रजापती, देव भारती आणि अंकुश चौधरी हे सर्व मित्र पानशेत परिसरात पर्यटनासाठी आले होते. दुपारी तीनच्या सुमारास ते पानशेत धरणाच्या कॅनॉलजवळ पोहोचले. कॅनॉलवर गेल्यानंतर आदर्श, देव आणि अंकुश हे तिघे जण पाण्यात उतरले. मात्र, अंकुशला पोहता येत नसल्याने आणि अचानक पाण्याचा व खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे तो पाण्यात बुडू लागला.
हे पाहून त्याचे मित्र देव आणि आदर्श यांनी त्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला; मात्र पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने अंकुश खोल पाण्यात वाहून गेला. घटनेची माहिती मिळताच वेल्हे पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या पानशेत पोलीस दूरक्षेत्राचे कर्मचारी, धरणावरील सुरक्षा रक्षक आणि आपत्ती व्यवस्थापन पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.
आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या जवानांनी कॅनॉलच्या पाण्यात शोधमोहीम राबवून अंकुशचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. या घटनेची नोंद वेल्हे पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस हवालदार पंकज मोघे पुढील तपास करत आहेत.





