Pune Census : महापालिकेचा कडक पवित्रा! जनगणना सर्वेक्षणात दांडी मारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार
Pune Census : पुणे शहरात जनगणनेच्या कामात मोठी दिरंगाई; सुमारे एक हजार प्रगणक आणि पर्यवेक्षकांनी काम सुरू न केल्याने प्रशासनाची गंभीर दखल.

Pune Census – पुणे शहरात जनगणनेच्या प्रशिक्षण कार्यक्रमाला उपस्थित राहिले; परंतु दहा दिवस उलटून गेले तरी प्रत्यक्ष काम सुरू न केलेल्या कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, असे आदेश राज्याच्या मुख्य जनगणना कार्यालयाने महापालिकेला दिले आहेत. त्यामुळे एक संधी या दांडीबहाद्दरांना देणार आहे, तरीही त्यांनी काम सुरू केले नाही, तर गुन्हे दाखल करणार असल्याचे महापालिका अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी सांगितले.
यासंदर्भात सोमवारी राज्य सरकारच्या जनगणना कार्यालयाने आढावा बैठक घेतली. त्यामध्ये अन्य शहरांच्या तुलनेत पुणे मागे असल्याचे निदर्शनास आले. शहरात राष्ट्रीय जनगणना कार्यक्रमाला सुरुवात झाली असून, अनेक ठिकाणची ही गणना सत्तर टक्क्यांच्या घरात पोहोचली आहे. मात्र, पुण्यात घरांचे सर्वेक्षण करण्यासाठी नेमलेल्या सुमारे एक हजार प्रगणकांनी अद्याप सर्वेक्षणच सुरू केले नसल्याने राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत पुणे शहर सर्वेक्षणामध्ये मागे पडले आहे.
त्यामुळे या दांडी मारलेल्या प्रगणक आणि पर्यवेक्षकांनी तातडीने मोहीमेत सहभागी व्हावे; अन्यथा कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. वसई, विरार आणि अन्य काही ठिकाणी असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पंधरा क्षेत्रीय कार्यालयांच्या सहाय्यक आयुक्तांकडून याचा आढावा घेतल्यानंतर या कामासाठी नेमलेल्या सुमारे एक हजार प्रगणक आणि पर्यवेक्षकांनी अद्याप कामच सुरू केले नसल्याचे निदर्शनास आले आहे. संबंधित कर्मचार्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश सहाय्यक आयुक्तांना दिल्याचे दिवटे यांनी नमूद केले.
सर्वेक्षणाचे ४० टक्केच काम
जनगणना मोहिमेअंतर्गत दुसर्या टप्प्यातील घरांच्या सर्वेक्षणासाठी महापालिकेच्या कर्मचार्यांसोबतच अनुदानित आणि विनाअनुदानित शाळा, महाविद्यालयांचे सुमारे अकरा हजार प्रगणक आणि १६०० पर्यवेक्षक नेमण्यात आले आहेत. सहा प्रगणकांवर एक पर्यवेक्षक नेमण्यात आला आहे. मात्र, पर्यवेक्षकांनीही दांडी मारल्याने या कामात अडथळे निर्माण होत आहेत. १५ मे ते १४ जून दरम्यान घरांचे सर्वेक्षण पूर्ण करायचे असून, अद्याप ४० टक्क्यांच्या आसपासच काम झाले आहे.




