pune : जलतरण तलाव, वॉशिंग सेंटर बंद न ठेवल्यास कारवाई
Pune:

Pune: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शहरात दहा टक्के पाणी कपात लागू केली असली, तरी शहरातील जलतरण तलाव आणि वॉशिंग सेंटर अद्यापही सुरू आहेत. प्रशासनाने संबधित आस्थापनांना नोटीस देऊन कारवाई करावी, असे आदेश स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी गुरुवारी दिले.
राज्य सरकारच्या आदेशानुसार महापालिकेने शहरात १० टक्के पाणी कपात लागू केली आहे. यासंदर्भात मागील आठवड्यात निवेदन प्रसिद्ध करताना प्रशासनाने पाणी बचतीसाठी जलतरण तलाव आणि वॉशिंग सेंटरही बंद ठेवण्याचे आदेश देऊनही जलतरण तलाव आणि वॉशिंग सेंटर राजरोस सुरू आहेत.
यासंदर्भात माहिती देताना भिमाले यांनी प्रशासनाला पाणी बचतीबाबत काटेकोर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अधिकार्यांनी जलतरण तलाव आणि वॉशिंग सेंटर्सला प्रत्यक्ष भेट देऊन ते बंद करण्याबाबत कार्यवाही करावी. याचा अहवाल येत्या स्थायीच्या बैठकीत सादर करावा, असे आदेश प्रशासनाला दिले आहेत.





