Pune Accident : एक्सप्रेसवेवर भीषण अपघात! कंटेनर थेट कारवर उलटला; पुण्यातील ३ जणांचा जागीच मृत्यू
Pune Accident : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ भरधाव कंटेनरचा ताबा सुटल्याने अपघात; ५ वाहनांना धडक देत कंटेनर इनोव्हा कारवर कोसळला.

Pune Accident – मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ एका कंटेनर रस्त्यावरील काही वाहनांना धडक दिली त्यानंतर कंटेनर इनोव्हा कारवर कोसळला. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले आहेत. बुधवारी सकाळी मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर हा अपघात झाला.
इनोव्हामधीलअपघातात अंबादास दामू पेटारे -सिंहगड रोड पुणे, श्रीकांत अनंत जाधव – ६३ पुणे, प्रमोद संतोष पवार – पुणे यांचा जागीच मृत्यू झाला तर कंटेनर चालक अवधेश यादव रा. नवी मुंबई रेल्वे यार्ड यांसह काही जण जखमी झाले आहेत जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
या भीषण दुर्घटनेत इनोव्हा कारसह एकूण पाच वाहने नुकसानग्रस्त झाली आहेत. प्राथमिक माहितीनुसार, मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ भरधाव वेगातील कंटेनर चालकाचा ताबा सुटल्याने त्याने मार्गावरील अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. त्यानंतर कंटेनर डाव्या बाजूला उलटून थेट इनोव्हा कारवर पडला. या भीषण दुर्घटनेत इनोव्हा कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला.
एकूण पाच वाहने या अपघातात नुकसानग्रस्त झाली असू अपघातानंतर तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले असून काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. अपघातामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता, मात्र पोलिसांनी तत्काळ वाहतूक सुरळीत केली.
याप्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे. तर अपघाताची माहिती मिळताच आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, बोरघाट महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा, खोपोली पोलीस स्टेशनची यंत्रणा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, मृत्युंजय देवदूत आणि हेल्प फाउंडेशनची टीम मदत कार्यासाठी घटनास्थळी पोहचली.




