Ranji Trophy 2025 : पृथ्वी शॉचा रणजीत मोठा धमाका! चौकार-षटकारांची बरसात करत ठोकलं विक्रमी द्विशतक

Prithvi Shaw 2nd Fastest Double Century : भारतीय कसोटी संघातून बाहेर असलेल्या पृथ्वी शॉ ने रणजी ट्रॉफी २०२५-२६ मध्ये आपल्या फलंदाजीचा दमदार नमुना दाखवला आहे. चंडीगडविरुद्ध एलिट गट बी सामन्यात महाराष्ट्राकडून खेळताना पृथ्वीने दुसऱ्या डावात अवघ्या १४१ चेंडूंमध्ये द्विशतक झळकावले. हे रणजी ट्रॉफीच्या एलिट गटातील दुसरे सर्वात जलद द्विशतक ठरले आहे. या खेळीने पृथ्वीने राहुल सिंग यांचा २०२३-२४ मध्ये १४३ चेंडूंमध्ये केलेला विक्रम मोडला. मात्र, रवी शास्त्री यांचे १९८४-८५ मध्ये १२३ चेंडूंतील द्विशतक अजूनही अव्वल स्थानी आहे.
महाराष्ट्रासाठी दुसऱ्या सामन्यातच यश –
मुंबई सोडून यंदाच्या हंगामात महाराष्ट्राकडून खेळणारा पृथ्वी हा त्याचा दुसराच सामना आहे. या सामन्यात त्याने ७२ चेंडूंमध्ये शतक झळकावले होते, जे रणजी ट्रॉफीतील सहावे सर्वात जलद शतक आहे. भारतीय कसोटी संघातून बराच काळ बाहेर असलेल्या पृथ्वीने या खेळीने आपला आत्मविश्वास आणि फॉर्म दाखवून दिला आहे. ही खेळी भारतीय प्रथम श्रेणी क्रिकेटमधील तिसरे सर्वात जलद द्विशतक आहे. यात रवी शास्त्री (१२३ चेंडू, १९८५, बडोदाविरुद्ध) आणि तन्मय अग्रवाल (११९ चेंडू, २०२४, अरुणाचल प्रदेशविरुद्ध) यांच्यापाठोपाठ पृथ्वीचा क्रमांक लागतो.
महाराष्ट्राने घेतली ४६३ धावांची भक्कम आघाडी –
Another brilliant comeback knock from Prithvi Shaw in the Ranji Trophy! 🔥
A 72-ball hundred against Chandigarh. 💯👏#PrithviShaw #RanjiTrophy pic.twitter.com/ziw4ibP2wR
— Saabir Zafar (@Saabir_Saabu01) October 27, 2025
चंडीगडविरुद्धच्या रणजी ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राने दुसरा डाव ३ बाद ३५९ धावांवर घोषित केला आणि चंडीगडसमोर ४६४ धावांचे आव्हान ठेवले. पृथ्वीने १५६ चेंडूंमध्ये २९ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद २२२ धावा केल्या. त्याच्यासोबत सिद्धेश वीरने ६२, ऋतुराज गायकवाडने ३६ आणि अर्शिन कुलकर्णीने ३१ धावांचे योगदान दिले. याआधी, महाराष्ट्राने पहिल्या डावात ३१३ धावा केल्या होत्या, तर चंडीगडचा पहिला डाव २०९ धावांत आटोपला. यामुळे महाराष्ट्राला पहिल्या डावात १०४ धावांची आघाडी मिळाली होती. दुसऱ्या डावातील दमदार फलंदाजीमुळे महाराष्ट्राने ही आघाडी आणखी मजबूत केली.
हेही वाचा – Commentator Emotional : रोहित-विराटला ऑस्ट्रेलियात शेवटचं खेळताना पाहून समालोचकही भावूक, VIDEO व्हायरल
पृथ्वीच्या कामगिरीने वाढला आत्मविश्वास –
पृथ्वी शॉच्या या खेळीने त्याच्या भारतीय संघात पुनरागमनाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. रणजीतील सातत्यपूर्ण कामगिरी त्याला राष्ट्रीय संघाच्या निवड समितीच्या रडारवर आणू शकते. चंडीगडविरुद्धच्या सामन्यातील ही खेळी आणि महाराष्ट्राची मजबूत स्थिती यामुळे पृथ्वीने आपली क्षमता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. आता निवड समिती त्याच्या या कामगिरीचा कसा विचार करते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.





