Ranji Trophy 2025 : तुषार देशपांडे बेशुद्ध पडला, तरी रणजीत मुंबईला विजय मिळवून दिला!

Tushar Deshpande Unconscious in Ranji Trophy 2025 : रणजी ट्रॉफी २०२५ स्पर्धेला सुरुवात झाली असून, पहिल्या सामन्यात मुंबईने जम्मू-काश्मीरवर शानदार विजय मिळवला. श्रीनगरच्या शेर-ए-काश्मीर स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात मुंबईचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे चमकला, पण तो त्याच्या गोलंदाजीइतकाच एका अनपेक्षित कारणामुळे चर्चेत आला. ज्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
तुषार देशपांडे अचानक पडला बेशुद्ध –
सामन्यादरम्यान, वॉर्मअप करताना तुषार देशपांडे अचानक बेशुद्ध पडला होता. श्रीनगरच्या उंचावर असलेल्या स्टेडियममध्ये ऑक्सिजनचे प्रमाण कमी असल्याने त्याला श्वास घेण्यास त्रास झाला. त्याला तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्याच्यावर आपत्कालीन उपचार करण्यात आले. डॉक्टरांनी त्याची प्रकृती तपासल्यानंतर त्याला मैदानात परतण्याची परवानगी मिळेल की नाही याबाबत शंका होती. मात्र, तुषारने सर्वांना आश्चर्यचकित करत रुग्णालयातून थेट मैदान गाठले आणि शार्दूल ठाकूरसोबत मिळून मुंबईच्या वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळली.
पूर्णपणे तंदुरुस्त नसतानाही तुषारने केली कमाल –
पूर्णपणे तंदुरुस्त नसतानाही तुषारने दुसऱ्या दिवशी मैदानात उतरून ३५ षटके टाकली आणि ४ गडी बाद केले. राजस्थान रॉयल्सच्या अधिकृत वेबसाइटवरील माहितीनुसार, तुषार म्हणाला, “हा सामना माझ्यासाठी आणि आमच्या संघासाठी खूप महत्त्वाचा होता. गेल्या हंगामात जम्मू-काश्मीरने आम्हाला पराभूत केले होते. त्यामुळे यंदा त्यांच्यावर विजय मिळवून हंगामाची सुरुवात करायची होती. दीड वर्षांनंतर रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन करताना हा सामना माझ्यासाठी खास होता.”
हेही वाचा – R Ashwin : अभिषेक-बुमराह अन् सॅमसनचा नंबर मागणाऱ्या नकली झाम्पाची अश्विनने अशी घेतली फिरकी, पाहा VIDEO
या सामन्यात जम्मू-काश्मीरकडून राजस्थान रॉयल्सचा माजी यष्टिरक्षक फलंदाज पारस डोगराने १४४ धावांची शानदार खेळी केली, पण त्याची ही खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. मुंबईने पहिल्या डावात ६१ धावांची आघाडी घेत सामन्यावर वर्चस्व गाजवले. तुषारच्या गोलंदाजीच्या जोरावर आणि संघाच्या एकत्रित प्रयत्नांमुळे मुंबईने हा सामना जिंकून रणजी ट्रॉफी २०२५ ची दमदार सुरुवात केली.





