नवी दिल्ली – यंदाही सण-उत्सवात स्थानिक उत्पादनांच्या खरेदीलाच प्राधान्य द्या. या सणासुदीच्या काळात अशाच उत्पादनांनी आपले घर सजवा, ज्यात कुणा देशबांधवाच्या घामाचा सुगंध आहे. आत्मनिर्भर भारत, स्वावलंबी भारताचे आपले स्वप्न असून आपण सर्वांनी मिळून हे स्वप्न पूर्ण करूया, असे आवाहन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM modi) यांनी रविवारी जनतेला पुन्हा एकदा “व्होकल फॉर लोकल’चे आवाहन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “मन की बात’ (Mann Ki bat) कार्यक्रमाचा 106वा भाग रविवारी प्रसारित झाला. या कार्यक्रमातून त्यांनी देशवासीयांशी संवाद साधला. लोक दिवाळीचे दिवे खरेदी करतात आणि नंतर समाज माध्यमावर, “व्होकल फॉर लोकल’ अशी टिप्पणी टाकतात. पण “व्होकल फॉर लोकल’ हा मंत्र केवळ सणासुदीपुरता मर्यादित नाही. ही तर फक्त सुरुवात आहे. तर, दैनंदिन जीवनातील कुठलीही गरज स्थानिक उत्पादनानेच पूर्ण करावी. आपल्या देशात आता सर्व काही उपलब्ध आहे, याकडे नरेंद्र मोदी यांनी लक्ष वेधले.
आज भारत जगातील सर्वात मोठे उत्पादन केंद्र बनत आहे. अनेक मोठमोठे ब्रॅंड, नामांकित उत्पादक, त्यांची उत्पादने येथे तयार करत आहेत. आपण ती उत्पादने स्वीकारली, तर “मेक इन इंडिया’ला चालना मिळते आणि हे सुद्धा एक प्रकारे “व्होकल फॉर लोकल’च ठरेल.
ही उत्पादने खरेदी करताना, यूपीआय डिजिटल पेमेंट प्रणालीद्वारे व्यवहार करण्यावर भर द्या. आपल्या जीवनात ही सवय लावून घ्या आणि त्या उत्पादनासह किंवा त्या कारागिरासह आपला सेल्फी फोटो, नमो ऍपवर पोस्ट करून माझ्यापर्यंत पोहोचवा आणि ते सुद्धा भारतातच बनवलेल्या स्मार्टफोनच्या माध्यमातून. मी यापैकी काही छायाचित्रे, काही टिप्पण्या सोशल मीडियावर शेअर करेन, जेणेकरून इतर लोकांनाही “व्होकल फॉर लोकल’साठी प्रेरणा मिळेल, असे ते म्हणाले.
भारतीय उत्पादनांनी दिवाळी साजरी कराल, तेव्हा दिवाळीचा झगमगाट तर आणखी जास्त वाढेलच, शिवाय त्या कारागिरांच्या आयुष्यात एक नवी दिवाळी येईल. भारताला स्वावलंबी बनवा, नेहमी मेक इन इंडिया निवडत जा. यामुळे आपल्यासोबतच आपल्या कोट्यवधी देशवासीयांची दिवाळी स्मरणीय होईल.
– नरेंद्र मोदी, पंतप्रधान