PMC Ward Committee: राजकीय कार्यकर्त्यांचे पुनर्वसन बंद? प्रभाग समित्यांवरील नियुक्तीबाबत महापालिकेचा मोठा निर्णय
PMC Ward Committee: १८ ऑगस्टपासून सहाय्यक आयुक्त कार्यालयात मिळणार अर्ज; पोस्टाने पाठवलेले किंवा अपूर्ण माहिती असलेले अर्ज नाकारले जाणार.

PMC Ward Committee – महापालिकेच्या १५ प्रभाग समित्यांवर प्रत्येकी ३ स्वयंसेवी संस्था आणि समाजसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची नियुक्ती होणार असून त्यासाठी १८ ऑगस्टपासून अर्ज उपलब्ध होणार आहेत. आवश्यक कागदपत्रांसह ४ सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत आहे. पालिका निवडणुकीनंतर अनेक राजकीय पक्षांनी इच्छुकांची या पदावर वर्णी लावण्यासाठी तयारी केली आहे. आयुक्तांनी स्वयंसेवी प्रतिनिधींच्या नियुक्तीस मान्यता दिली आहे.
या पदावर राजकीय कार्यकर्त्यांचे पुनर्वसन केले जात असल्याने उच्च न्यायालयाच्या २०१९ च्या निर्देशानुसार निवड प्रक्रियेत बदल केला आहे. यासाठी संबंधित संस्था मुंबई सार्वजनिक न्यास अधिनियम १९५० किंवा सोसायटी नोंदणी अधिनियम १८६० अंतर्गत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. तसेच नामनिर्देशनाच्या तारखेपूर्वीच्या तीन वर्षांचे लेखापरीक्षित आर्थिक विवरणपत्र,
कामाचा अहवाल धर्मादाय आयुक्तांकडे सादर केलेला असणे बंधनकारक आहे. संविधानाच्या अनुसूची १२ मध्ये नमूद महापालिकेच्या कामांशी संबंधित किमान एक प्रकल्प संस्थेने मागील तीन वर्षांत पूर्ण करणे बंधनकारक आहे. स्वयंसेवी प्रतिनिधीसाठीचा अर्ज १८ ऑगस्ट ते १ सप्टेंबरदरम्यान संबंधित सहायक आयुक्तांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत मिळेल.
प्रत्यक्ष अर्ज भरावा लागणार आहेत. पोस्टाने पाठविलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अपूर्ण कागदपत्रे, अपूर्ण माहिती किंवा संबंधित प्रभागाच्या कार्यक्षेत्राबाहेरील संस्थांचे अर्ज नाकारण्याचा अधिकार सहायक आयुक्तांना आहे. याबाबत वाद निर्माण झाल्यास आयुक्तांचा निर्णय अंतिम असेल.
राजकीय पदाधिकाऱ्यांना दरवाजे बंद
प्रभाग समितीचा सदस्य म्हणून नामनिर्देशन होणारी व्यक्ती कोणत्याही राजकीय पक्षाची पदाधिकारी नसावी. तसेच केंद्र किंवा राज्य शासन, महापालिका अथवा अन्य स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सेवेतील व्यक्ती पात्र ठरणार नाही. संबंधित व्यक्तीची प्रभाग समितीच्या अधिकार क्षेत्रात मतदार म्हणून नोंदणी आवश्यक आहे. प्रभाग समितीवर तीनपेक्षा अधिक प्रतिनिधी नियुक्त करता येणार नाहीत. प्राप्त अर्जांमधून प्रतिनिधींची निवड संबंधित प्रभाग समितीतील नगरसेवक करतील.





