PMC News : पाणी नेमकं जातंय कुठं? महापालिकेच्या ‘या’ मोठ्या निर्णयामुळे गुपित येणार बाहेर
PMC News : पाणी कपातीमुळे नागरिक त्रस्त, मात्र जॅकवेलवरील दुरुस्तीमुळे शहराचा पाणीपुरवठा अधिक सुरक्षित झाल्याचा महापालिकेचा दावा.

PMC News : महापालिकेने गुरुवारी (दि. २३) पाणीपुरवठा बंद ठेवून एकाच वेळी मोठ्या प्रमाणात दुरुस्तीची कामे हाती घेतली. दुरुस्तीची कामे लांबल्याने शुक्रवारी संपूर्ण शहराला सलग दुसऱ्या दिवशी पाणीसाठी मनस्ताप सहन करावा लागला. प्रत्यक्षात या दुरुस्तीमुळे शहरावरील भविष्यातील मोठे पाणीसंकट टाळण्यास मदत होणार आहे.
तब्बल दोन ते अडीच लाख नागरिकांचे पाणी नेमके कुठे जाते याचाही तपास लागणार आहे. पालिकेने केलेल्या कामांमध्ये खडकवासला जॅकवेल येथे मुख्य जलवाहिनीला पाण्याचा व्हॉल्व बसविणे आणि पर्वती जलकेंद्रात घेतल्या जाणाऱ्या पाण्याला फ्लो मीटर बसविणे या दोन कामांचा समावेश होता. पालिकेला खडकवासला धरणातून सुमारे ३००० मिमी व्यासाच्या बंद जलवाहिनीद्वारे पाणी येते.
त्यासाठी जॅकवेलच्या जलवाहिन्या धरणाच्या तळाशी आहेत. त्या जलवाहिन्यांना पाटबंधारे विभागाने ६० वर्षांपूर्वीचे व्हॉल्व्ह बसविले आहेत. हे व्हॉल्व जुने असल्याने ते पूर्णपणे बंद होत नाहीत. त्यातच, पालिकेकडून धरणातून पाणी घेण्यासाठी टाकलेली पहिली जलवाहिनी १९९९ मधील आहे. ही जलवाहिनी अनेक ठिकाणी कमकुवत झाली असून ती फुटण्याचा धोका निर्माण झाला आहे.
त्यामुळे तिच्या दुरुस्तीसाठी पाटबंधारे विभागाने बसविलेले जॅकवेलचे व्हॉल्व पूर्णपणे बंद होणे आवश्यक आहे. मात्र, ते बंद होत नसल्याने दुरुस्ती रखडली आहे. त्यामुळे या व्हॉल्व्हच्या पुढील बाजूस महापालिकेने नव्याने आपला व्हॉल्व बसविला असून त्यामुळे आता जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी १०० टक्के पाणी बंद करणे शक्य होणार आहे. त्यामुळे दुरुस्तीचे कामही वेगाने करता येणार आहे. तसेच भविष्यात जलवाहीनी फुटली तरी पूर्ण पाणी बंद करता येणार असल्याने तातडीनं दुरूस्तीही करता येईल.
३० एमएलडी पाणी जाते कोठे?
महापालिका धरणातून घेत असलेल्या पाण्याला फ्लो मीटर बसविले आहेत. त्यानंतर हे पाणी पर्वती जलकेंद्रात येते. तसेच, प्रक्रियेनंतर पुढे लष्कर जलकेंद्र आणि इतर पाणीपुरवठा विभागांना सोडले जाते. मात्र, धरणातून घेतलेले पाणी आणि पर्वती जलकेंद्रातून प्रक्रिया करून सोडलेले पाणी यात प्रतिदिन सुमारे ३० एमएलडी पाण्याची तफावत आहे. हे पाणी एका दिवसाला तब्बल २ ते ३ लाख नागरिकांना पुरेल एवढे आहे.
त्यामुळे ही गळती शोधण्यासाठी पालिकेने आता खडकवासला धरणातून बंद जलवाहिनी आणि पर्वती जलकेंद्रात पाणी .ते तेथे फ्लो मीटर बसविला आहे. परिणामी, खडकवासला धरणातून घेतलेले पाणी, प्रत्यक्षात पर्वती जलकेंद्रात आलेले पाणी आणि शुद्ध करून शहरात सोडलेले पाणी याचे, मोजमाप केले जाणार असून ३० एमएलडी पाणी नेमके कुठे जाते हे शोधता येईल.





