Manjusha Nagpure: पुण्यासाठी २५ टीएमसी पाणी द्या! महापौर मंजुषा नागपुरे यांची जलसंपदामंत्र्यांकडे मागणी
Manjusha Nagpure: भविष्यातील गरजांसाठी २५ टीएमसी पाणी कोटा मंजूर करण्याचे आवाहन; मुंबईतील बैठकीत जलसंपदामंत्र्यांचे सकारात्मक संकेत.

Manjusha Nagpure – पुणे शहराच्या भविष्यातील वाढत्या गरजा लक्षात घेऊन शहरासाठी २५ टीएमसी पाणी कोटा मंजूर करावा, तसेच खडकवासला धरणसाखळीतील गाळ काढून जलसाठा क्षमता वाढवण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी आग्रही मागणी महापौर मंजुषा नागपुरे यांनी राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली. महापौरांनी मुंबई येथे ही भेट घेत मागणी केली.
या बैठकीत धायरी परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रस्तावित दोन पुलांच्या बांधकामास जलसंपदा विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) तातडीने मंजूर करण्याची मागणी महापौरांनी केली. याशिवाय मुळा-मुठा नदीच्या संवर्धनासाठी राज्यस्तरीय ‘मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन मिशन’ स्थापन करून नदीतील गाळ काढणे,
प्रदूषण नियंत्रण आणि पूर व्यवस्थापनासाठी एकात्मिक आराखडा राबवण्याची सूचना त्यांनी केली. खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांतील गाळ काढून जलसाठा क्षमता पूर्ववत करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी आणि त्यासाठी संयुक्त उच्चस्तरीय समिती स्थापन करावी, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.
“पुणेकरांना शाश्वत पाणीपुरवठा, कोंडीमुक्त रस्ते, सुरक्षित जलस्रोत आणि स्वच्छ मुळा-मुठा नदी मिळणे ही काळाची गरज आहे. शहराच्या विकासाशी संबंधित प्रत्येक महत्त्वाच्या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा करून त्यावर तातडीने निर्णय व्हावा, म्हणूनच ही भेट घेतली. जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्व मागण्या सकारात्मकरित्या ऐकून घेतल्या असून, संबंधित विषयांवर आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.”
– मंजूषा नागपुरे (महापौर)





