PMC News : त्या झाडांचे पुढे झाले काय ? पालिकेचा अजब कारभार; उत्तरे वाचून तुम्हीही चक्रावून जाल
PMC News : गेल्या दोन वर्षांत लावलेली १७ हजार ५३३ झाडे जगली की मरली? पालिकेच्या उद्यान विभागाकडे माहितीच उपलब्ध नसल्याने संताप.

PMC News : शहरातील विकासकामे, खासगी बांधकामांसाठी गेल्या दोन वर्षांत काढलेल्या झाडांच्या बदल्यात झाडे लावण्यात आली. मात्र, या झांडाचे पुढे काय झाले याची कोणतीही माहिती पालिकेच्या उद्यान विभागाकडे नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पालिकेच्या एप्रिलमधील सभेसाठी नगरसेवक दत्ता बहिरट यांनी हा झाडांचा प्रश्न उपस्थित केला होता. त्याच्या उत्तरातून ही बाब समोर आली आहे.
या माहितीनुसार काढण्यात आलेल्या झाडांच्या मोबदल्यात एप्रिल २०२४ ते एप्रिल २०२६ या कालावधीत पालिकेने १७ हजार ५३३ झाडे नव्याने लावली होती. ही झाडे जगली की मरली याची माहिती विचारण्यात आली होती. ही माहिती विस्तृत असल्याने सर्वेक्षण करून ती संकलित करावी लागणार असल्याचे उत्तर प्रशासनाने दिले आहे. तसेच, याबाबत १५ क्षेत्रीय कार्यालयांना ही माहिती संकलीत करण्याचे आदेशही दिल्याचे नमूद करण्यात आले आहे.
शहरात वृक्षगणना केल्यानंतर पालिकेने किती झाडे काढली, किती झाडांचे पुनर्रोपण केले. तसेच या झाडांच्या बदल्यात किती नवीन झाडे लावली असा प्रश्न नगरसेवक बहिरट यांनी विचारला होता. त्यावर उत्तर देताना शहरात १८ मार्च २०२४ पर्यंत वृक्षगणना केली असून, त्यानुसार ५७ लाख ८१ हजार झाडे असल्याचे प्रशासनाने उत्तरात नमूद केले.
वृक्षगणनेनंतर गेल्या दोन वर्षात पालिकेने ७ हजार १३२ झाडे काढण्यास परवानगी दिली आहे तर ६ हजार २५४ झाडांचे पुनर्रोपण केले आहे. तसेच, काढलेल्या झाडांच्या मोबदल्यात १७ हजार ५३३ झाडे लावण्यात आली आहेत. मात्र, या लावलेल्या झाडांचे दोन वर्षात काय झाले, ती जागेवर आहेत की नाही याची कोणतीही माहिती प्रशासनाकडे नाही.
१० टक्के ग्रीन कव्हर
बेसुमार बांधकामांमुळे शहराचे तापमान ४२ अंशाच्या वर पोहचले असतानाच दुसरीकडे शहरातील झाडांचे हरित आच्छादन ( ग्रीन कव्हर) मात्र कमी होत आहे. शहराची हद्द ५१८ चौरस किलोमीटर असताना शहरातील ग्रीन कव्हर मात्र अवघे २५.०१ चौरस किलोमीटर म्हणजेच जुन्या हद्दीच्या १० टक्के तर नव्याने समाविष्ट गावानंतर केवळ ५ टक्केच आहे. याचा शहराच्या पर्यावरणावर गंभीर परिणाम होत आहे.
५० लाख झाडे लावणार कुठे ?
लावलेल्या झाडांची कोणतीही माहिती प्रशासनाकडे नसताना दुसरीकडे पालिकेने नवी ५० लाख झाडे लावण्याचा संकल्प अंदाजपत्रकात व्यक्त केला आहे. प्रत्यक्षात, शहरात नवीन झाडे लावण्यासाठी जागा नसल्याने पालिकेने वन विभागाकडे जागांची मागणी केली आहे. त्यामुळे, पालिका एवढी झाडे लावणार तरी कुठे असा प्रश्न आहे. तसेच आधीच लावलेल्या झाडांची माहिती प्रशासनाकडे नसेल तर नवीन झाडांची तरी नोंद ठेवणार का असाही प्रश्न आहे.





