PMC News: महापालिकेचा अजब कारभार! एका बाजूला बेसुमार वृक्षतोड, तर दुसरीकडे वृक्षारोपणासाठी दीड कोटींची उधळपट्टी?
PMC News: शहरात विकासकामांच्या नावाखाली बेसुमार वृक्षतोड सुरू असतानाच पावसाळ्याच्या तोंडावर देशी झाडे लावण्यासाठी स्थायी समितीची दीड कोटींना मंजुरी.

PMC News – विकास प्रकल्पांच्या नावाखाली महापालिकेकडूनच शहरात वारेमाप वृक्षतोड सुरू असताना, आणि वृक्षलागवडीचे बोगस प्रकार उघड होत असताना दुसरीकडे महापालिकेकडून वृक्षारोपणासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जाणार आहेत. त्यासाठी पावसाळ्याचे निमित्त साधून देशी झाडे लावण्याचे कारण पुढे करून स्थायी समितीत दीड कोटी रुपयांच्या प्रस्तावाला गुरूवारी मंजुरी देण्यात आली.
स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. शहराच्या वेगवेगळ्या भागात महापालिकेसह विविध सरकारी संस्थांकडून बेसुमार वृक्षतोडीचे प्रकार सुरू आहे. तर प्रशासनाकडून तोडलेल्या झाडांच्या बदल्यात दुसरीकडे झाडे लावण्याऐवजी ती लावल्याचे कागदावरच दिसून येत आहेत. त्याविरुद्ध पर्यावरण आणि वृक्षप्रेमी नागरिक गेल्या अनेक महिन्यांपासून आवाज उठवत अहेत परंतु त्यांना प्रतिसाद दिला जात नाही, अशी स्थिती आहे.
प्रशासनाकडून गणेशखिंड रस्त्यावरील वृक्षतोडीला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, परंतु शहरातील अन्य ठिकाणांचे काय हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. अशी परिस्थिती असताना महापालिकेकडून शहराच्या वेगवेगळ्या भागात वृक्षारोपण केले जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयास १० लाख रुपये, याप्रमाणे १५ क्षेत्रीय कार्यालयांना वृक्षारोपण करण्यासाठी दीड कोटी रुपये देण्यात येणार आहेत.
त्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. पर्वती, तळजाई टेकडी, गुजर निंबाळकरवाडी यांसह शहराच्या वेगवेगळ्या भागातील टेकड्या, उद्याने आणि अन्य सार्वजनिक ठिकाणी वड, पिंपळ यांसारखे देशी वृक्ष लावले जाणार आहेत. त्यामध्ये स्थानिक रहिवासी, पर्यावरण आणि वृक्षप्रेमी, महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमधील अधिकारी, कर्मचारी, शालेय-महाविद्यालीन विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले जाणार असल्याचे भिमाले म्हणाले.





