Satara News : पालिकेच्या नूतन इमारतीत पर्यावरण दिनसाजरा! खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते वृक्षारोपण
Satara News : हवामान बदलाच्या संकटावर मात करण्यासाठी झाडांची लागवड आणि संवर्धन ही काळाची गरज; खासदार उदयनराजे भोसले यांचे प्रतिपादन.

Satara News – सातारा पालिकेच्या नूतन इमारतीमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. भाजपचे पक्ष प्रतोद निशांत पाटील, उपनगराध्यक्ष ॲड. दत्ता बनकर, सातारा लोकसभा मतदारसंघाचे संयोजक सुनील काटकर, माजी नगराध्यक्ष विजय बडेकर, नियोजन सभापती अशोक शेडगे, नगरसेवक मनोज शेंडे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
उदयनराजे भोसले यांनी नूतन इमारतीची पाहणी करुन झालेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सातारा नगरपालिकेच्या कॅम्प सदर बाजारमधील नूतन इमारतीच्या परिसरामध्ये काही औषधी आणि काही शोभेची झाडे खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते लावण्यात आली. झाडांना पाणी घालून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.
जागतिक हवामानातील बदलामुळे भौगोलिक परिस्थिती वेगाने बदलत असून पर्जन्यमानावर परिणाम होत आहे. पर्यावरण जपले तर माणूस समृद्धपणे जगू शकेल, त्यासाठी झाडांची लागवड आणि त्याचे संवर्धन ही काळाची गरज असल्याचे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी नूतन इमारतीची पाहणी केली. या इमारतीचे सिलिंगचे काम शंभर टक्के पूर्ण झाले असून अंतर्गत सजावटीचे काम सुरू आहे.
ते काम उत्कृष्टपणे सुरु असल्याबद्दल खासदार उदयनराजे भोसले यांनी समाधान व्यक्त केले. सातारा शहराच्या विकास प्रक्रियेत कामकाज नियमनाकरता प्रशस्त इमारत ही काळाची गरज होती. या इमारतीच्या उद्घाटनासाठी बाबा कल्याणी यांच्याशी लवकरच संपर्क साधला जाईल. आम्ही आमचे वचन पूर्ण करू शकलो याचे समाधान आहे, अशी प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली.





