Pune Metro : पुणे मेट्रोच्या विस्तारीकरणसाठी शहरातील तब्बल ४६६ वृक्ष तोडण्याच्या प्रस्तावाला विरोध करत वृक्ष प्राधिकरणाकडे हरकत नोंदविली आहे. यापूर्वी तोडलेल्या वृक्षांच्या बदल्यात लावण्यात आलेल्या झाडांचे संगोपन करण्यात मेट्रोने गंभीर हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत नवीन वृक्षतोड प्रस्ताव फेटाळण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रुपेश राम केसेकर यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. पुणे मेट्रोच्या स्वारगेट ते कात्रज आणि वनाज ते एनडीए चौक विस्तारीकरण मार्गिकांसाठी विविध क्षेत्रीय कार्यालयांमध्ये वृक्षतोड प्रस्ताव दाखल केले आहेत. त्यामध्ये कोथरूडला ६३, विश्रामबागला १९१, बिबवेवाडीत ७७, कोंढवा-येवलेवाडीत २५ आणि धनकवडी कार्यालयात ११० वृक्ष तोडीचा समावेश असून एकूण ४६६ वृक्ष तोडण्याची परवानगी मागण्यात आली आहे. त्याबदल्यात १० हजारांहून अधिक वृक्ष लागवडीची अट तज्ञ समितीने घातली आहे. यापूर्वी वनाज ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी मार्गिकांसाठी तोडलेल्या वृक्षांच्या बदल्यात केलेल्या वृक्षलागवडीपैकी सुमारे ७० टक्के झाडे मृत झाल्याचा दावा केसेकर यांनी केला आहे. उर्वरित झाडांचाही ठावठिकाणा नसल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. तसेच वृक्ष प्राधिकरणाने वारंवार मागणी करूनही पुणे मेट्रोकडून सहामाही वृक्ष संगोपन अहवाल सादर केला नसल्याचा आरोप पत्रात करण्यात आला आहे. त्यामुळे यापूर्वीच्या वृक्षतोड परवान्यातील अटीनुसार भरपाई वृक्षलागवड करून त्याचा किमान सात वर्षांचा संगोपन अहवाल सादर केल्याशिवाय नवीन वृक्षतोड प्रस्ताव मंजूर करू नयेत, अशी मागणी त्यांनी पत्रात केली आहे.