Pune ST Division: पुणे एसटी महामंडळाला आले ‘अच्छे दिन’! एकाच महिन्यात मिळाला ७३ कोटींचा विक्रमी महसूल
Pune ST Division: खासगी ट्रॅव्हल्सचे दर गगनाला भिडल्याने सुट्यांमध्ये गावी जाणाऱ्या पुणेकरांचा एसटी प्रवासावर भर; एप्रिल आणि मे महिन्यात तब्बल १ कोटीहून अधिक प्रवाशांची नोंद.

Pune ST Division – रेल्वे तिकिटाला वेटिंग लिस्ट, तर खासगी ट्रॅव्हल्सचे दर गगनाला भिडलेले असा परिस्थितीत सर्वसामान्यांसह लाडक्या बहिणींनी लालपरीला पसंती देत एसटीला अच्छे दिन आणले. यंदाच्या उन्हाळ्यात एप्रिल आणि मे महिन्यात पुणे एसटी विभागाला १४१ कोटी रुपयांची कमाई झाली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १४ कोटींची घसघशीत वाढ झाली आहे. शिक्षण, नोकरी आणि व्यवसायानिमित्त पुण्यात आलेले अनेक कुटुंब उन्हाळी सुट्टीत गावी जातात, तर काही कुटुंब पर्यटन, देवदर्शन करतात.
त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्याकडे जाणाऱ्या गाड्यांना प्रवाशांची मोठी गर्दी असते. त्यामुळे दरवर्षी एसटीकडून प्रवाशांच्या सुविधेसाठी जादा बस सोडल्या जातात. त्यामध्ये यंदाही शिवाजीनगर, वल्लभनगर आणि स्वारगेट स्थानकांवरून विशेष जादा गाड्या सोडल्या आहेत, तसेच कोल्हापूर, सोलापूर आणि सांगली या मार्गावरही प्रवाशांची मोठी गर्दी आहे. गर्दीच्या काळात प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये, म्हणून स्थानकांवर पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
दरम्यान, यंदाच्या उन्हाळी सुट्टीत मार्च महिन्यात ६६ लाख ३२ हजार प्रवाशांनी प्रवास केला असून, एसटीला ५७ कोटी ९७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. एप्रिल महिन्यातही प्रवासी संख्या २ लाखांनी वाढून ६८ लाखांवर पोहोचली आणि उत्पन्न ६२ कोटी रुपयांवर गेले. मे महिना हा सुट्यांचा मुख्य काळ असल्याने या एकाच महिन्यात पुणे विभागाला सर्वाधिक ७३ कोटी रुपयांचा महसूल मिळाला, जो गेल्या वर्षाच्या मे महिन्यातील तुलनेत १० कोटींनी जास्त आहे.
“उन्हाळी सुट्यांमुळे प्रवाशांची गर्दी वाढली आहे. रेल्वेचे तिकीट न मिळाल्याने प्रवासी एसटी प्रवासाला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे वाढत्या गर्दीनुसार शिवाजीनगर आणि स्वारगेट येथील प्रमुख स्थानकांवरून जादा बसेसचे नियोजन केले आहे.”
– अरुण सिया, विभाग नियंत्रक, पुणे एसटी विभाग





