Pune Railway Mega Block: पुणे रेल्वे स्थानकावर ९ तासांचा मेगा ब्लॉक! ‘या’ महत्त्वाच्या एक्स्प्रेस आणि लोकल गाड्या झाल्या रद्द
Pune Railway Mega Block: पुणे-दौंड रेल्वे विभागात तांत्रिक कामांसाठी रविवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ब्लॉक; प्रवासाला निघण्यापूर्वी सुधारित वेळापत्रक तपासण्याचे आवाहन.

Pune Railway Mega Block – पुणे-दौंड रेल्वे विभागातील महत्त्वाच्या तांत्रिक कामांसाठी रविवार (दि. १४ जून) रोजी पुणे रेल्वे स्थानकावर तब्बल नऊ तासांचा मोठा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम होणार असून अनेक गाड्या रद्द, अंशतः रद्द आणि काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत. रविवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे.
या काळात रेल्वे प्रशासनातर्फे इलेक्ट्रिक, सिग्नल, दूरसंचार आणि ओव्हरहेड इक्विपमेंटची आदी महत्त्वाची कामे केली जाणार आहेत. या ९ तासांच्या कालावधीत, पुणे स्थानकावरील फलाट क्रमांक ३ आणि ४ हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडून येणाऱ्या गाड्यांच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहतील. त्यामुळे प्रवाशांनी रविवारी प्रवासाला निघण्यापूर्वी रेल्वेचे सुधारित वेळापत्रक तपासूनच बाहेर पडावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
गाडी क्रमांक ९९९०२ पुणे-तळेगाव लोकल, गाडी क्र. ९९९०३ तळेगाव-पुणे लोकल, गाडी क्र. ७१४०६ बारामती-पुणे डेमू, गाडी क्र. ७१४०७ पुणे-दौंड डेमू आणि गाडी क्र. ७१४२० सातारा-पुणे डेमू या गाड्या रविवारी धावणार नाहीत. तर गाडी क्र. १२१३५/३६ पुणे-नागपूर-पुणे एक्सप्रेस, गाडी क्र. ११००७/०८ मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन एक्सप्रेस या प्रमुख गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉकच्या काळात काही गाड्या पुणे स्थानकावर न येता उपनगरातील स्थानकांवर थांबतील.
त्यामध्ये गाडी क्र. १२९४० जयपूर – पुणे एक्सप्रेस आणि गाडी क्र. १२१२७ सीएसएमटी मुंबई-पुणे एक्सप्रेस खडकी स्थानकावर प्रवाशांसाठी थांबवल्या जातील. तर गाडी क्र. ११०७८ जम्मू तावी-पुणे झेलम एक्सप्रेस आणि गाडी क्र. ११४०६ अमरावती-पुणे एक्सप्रेस या गाड्या हडपसर स्थानकावर आपला प्रवास संपवतील. गाडी क्र. १२९३९ पुणे-जयपूर एक्सप्रेस आणि गाडी क्रमांक १२१२८ पुणे-मुंबई एक्सप्रेस या गाड्या पुण्या ऐवजी नियमित वेळेनुसार खडकी स्थानकावरून सुटतील. तसेच गाडी क्रमांक ११४२५ पुणे-कोल्हापूर एक्सप्रेस ही गाडी पुण्याऐवजी थेट सातारा स्थानकावरून कोल्हापूरसाठी रवाना होईल.





