PMC News: अत्यावश्यक कामांच्या नावाखाली नवे प्रस्ताव? नगरसेवक, आमदार- खासदार निधीतील कामांनाही ब्रेक
PMC News: आचारसंहितेत नवीन कामांना प्रशासकीय किंवा तांत्रिक मान्यता देण्यास तसेच नव्या निविदा प्रसिद्ध करण्यास पुणे महापालिका आयुक्तांचे निर्बंध.

PMC News- विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. मात्र, त्यानंतरही अनेक विभागप्रमुख अत्यावश्यक कामांच्या नावाखाली नवीन कामांचे प्रस्ताव सादर करत आहेत. ही बाब लक्षात आल्यानंतर नवीन विकासकामे सुरू करण्यास, नवीन कामांना प्रशासकीय किंवा तांत्रिक मान्यता देण्यास, तसेच नवीन निविदा प्रसिद्ध करण्यास महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी निर्बंध घातले आहेत.
आपत्कालीन परिस्थिती, अत्यावश्यक सेवा, नागरिकांच्या जीवितास किंवा सार्वजनिक मालमत्तेला असलेला धोका अशा अपरिहार्य परिस्थितीतच अपवादात्मक स्वरूपात कामे करता येतील. आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास संबंधित अधिकारी किंवा विभागप्रमुखांची जबाबदारी निश्चित केली जाणार असल्याचा इशाराही आयुक्तांनी दिला आहे.
याबाबत आयुक्तांनी परिपत्रक काढून सर्व विभागप्रमुख, खातेप्रमुख, क्षेत्रीय अधिकारी आणि संबंधित अधिकारी- कर्मचाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. आचारसंहितेत नागरी सेवा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक देखभाल व दुरुस्तीची कामेच करता येतील. मात्र, तरीही अनेक विभागांकडून नवीन कामांचे प्रस्ताव मान्यतेसाठी आले आहेत. तातडीने कामे असल्याचे सांगून ती रेटण्याचा प्रयत्न होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
लोकप्रतिनिधींच्या निधीलाही ब्रेक
नगरसेवकांच्या अर्थसंकल्पीय तरतुदी, नगरसेवक निधी अथवा प्रभागनिहाय तरतुदी, तसेच आमदार व खासदारांच्या शिफारशीवरून प्रस्तावित, मंजूर किंवा हाती घ्यावयाची कामेही आचारसंहितेच्या कालावधीत सुरू करता येणार नाहीत. कामे अपरिहार्य असल्यास सक्षम प्राधिकरणाची किंवा आयुक्तांची पूर्वपरवानगी आवश्यक आहे.
म्हणून काढले आदेश..
ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाने नगरसेवकांच्या ‘स’ यादीतील १ कोटी ४० लाख ९५ हजार ८९१ रुपयांच्या १७ कामांच्या निविदा काढल्या आहेत. प्रभाग क्रमांक १३ मधील पुणे स्टेशन, जय जवाननगर परिसरातील चेंबर दुरुस्ती, पादचारी मार्ग, मलनिःसारण वाहिनी, तसेच पावसाळी चेंबर व पाइप साफसफाईच्या कामांचा त्यात समावेश आहे. ही कामे अत्यावश्यक असल्याचे कारण दिले आहे.






