PMC News : ‘शहरी गरीब योजने’त महापालिकेची फसवणूक; ‘या’ रुग्णालयाविरोधात गुन्हा दाखल होणार
PMC News : शिवाजीनगर येथील रुग्णालयाने २०१७ पासून महापालिकेची फसवणूक केल्याचे चौकशी समितीच्या अहवालात निष्पन्न.

PMC News – शहरी गरीब योजनेत महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणात मॅग्नम रुग्णालयाविरोधात महापालिकेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी रुग्णालयाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शिवाजीनगर येथे हार्डीकर रुग्णालयाच्या आवारात हे मॅग्नम रुग्णालय आहे. सन २०१७ मध्ये या रुग्णालयाला शहरी गरीब योजनेच्या (एमपॅनल) यादीत समाविष्ट करण्यात आले होते.
तत्कालीन आरोग्य प्रमुख आणि शहरी गरीब योजना विभाग प्रमुख यांनी हा निर्णय घेतला होता. मात्र, आता त्यावेळी ज्यांनी या अर्जावर स्वाक्षरी केली होती. त्या त्यावेळी रुग्णालयाच्या पॅनलवर असलेल्या डाॅक्टरांनी ही आपली स्वाक्षरी नाहीच, अशी तक्रार महापालिकेकडे केली आहे. तसेच, योजनेचा लाभ रुग्णालयाच्या ज्या नावाने अजूनही घेतला जात आहे ते आता अस्तित्वातच नसल्याची तक्रारही करण्यात आली आहे.
त्यामुळे तक्रारीवरून अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी यावर दोन सदस्यीय चौकशी समिती गठित केली या चौकशी समितीने आपला अहवाल दिला असून, यामध्ये मॅग्नम रुग्णालयाने महापालिकेची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या रुग्णालयाविरोधात तक्रार दाखल करण्याचे आदेश कौर यांनी शहरी गरीब योजना विभागाचे प्रमुख डाॅ. सूर्यकांत देवकर यांना दिले. त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याविषयी तक्रार दिली आहे. यावरून पोलिसांनी रुग्णालयावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.





