Hinjewadi Metro – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या माण- हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या कामाला आता मोठी गती मिळाली असून, या मेट्रोचा पहिला टप्पा ३१ मेपर्यंत प्रवाशांसाठी खुला करण्याची तयारी सुरू आहे. या मार्गावरील १२ स्थानकांचे काम पूर्णत्वास आले असून, येत्या १५ मे रोजी होणाऱ्या टाटा आणि पीएमआरडीएच्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत मार्ग कार्यान्वित होण्यावर अंतिम शिक्कामोर्तब होईल. हिंजवडी आयटी हबमधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मैलाचा दगड ठरणाऱ्या या प्रकल्पाकडे संपूर्ण पुणेकरांचे लक्ष लागले आहे. सध्या माण-हिंजवडी ते बालेवाडी दरम्यानच्या १२ स्थानकांचे स्थापत्य काम ९५ टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले असून, केवळ किरकोळ दुरुस्ती आणि शेवटच्या टप्प्यातील सजावटीची कामे वेगाने सुरू आहेत. तांत्रिक चाचण्या आणि प्रवासी सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या सुविधांची पडताळणी युद्धपातळीवर सुरू असून, मे अखेर हा मार्ग कार्यरत होण्यासाठी सज्ज करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. १५ मे रोजी होणारी बैठक या प्रकल्पाच्या दृष्टीने निर्णायक मानली जात आहे. यामध्ये पीएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारी आणि टाटा समूहाचे प्रतिनिधी प्रत्यक्ष कामाचा सविस्तर आढावा घेणार आहेत. ३१ मेपर्यंत ही सेवा कार्यान्वित झाली, तर बालेवाडी स्टेडियमपर्यंत प्रवास करणाऱ्या हजारो आयटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, हिंजवडी परिसरातील रस्त्यांवरील वाहनांवरील ताण लक्षणीयरीत्या कमी होईल.