Tour Operator Fraud : पर्यटनाऐवजी पोलीस ठाण्याच्या फेऱ्या! ज्येष्ठ नागरिकांची १५ लाखांची फसवणूक; टूर ऑपरेटर फरार
Tour Operator Fraud : आसाम, मेघालय सहलीसाठी प्रतिव्यक्ती ५३ हजार रुपये भरूनही ज्येष्ठ नागरिकांचा खोळंबा; ऐनवेळी सहल रद्द करून मालक फरार.

Tour Operator Fraud – ईशान्य भारतातील निसर्गरम्य आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश पर्यटनाचे स्वप्न पाहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या गटासह अनेकांची सुमारे १५ लाख ३७ हजार रुपयांची फसवणूक करीत टूर ऑपरेटर कार्यालय बंद करून पसार झाला. याबाबत नांदेड सिटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांना पर्यटनाएवजी या घटनेमुळे पोलीस ठाण्यांच्या फेऱ्या मारण्याची वेळ आली.
याप्रकरणी बावधन येथील निशिकांत ठाणेदार (वय ७२) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सांगितले की, जानेवारी २०२६ मध्ये ईशान्य भारतातील सेव्हन सिस्टर्स राज्यांची सहल करण्याचा बेत आखण्यात आला, त्यावेळी भारतत्त्व टुरिझम सर्व्हिसेस या किरकटवाडी येथील टूर कंपनीच्या प्रतिनिधींनी ११ दिवस व १० रात्रींचे आकर्षक पॅकेज, विमानप्रवास, निवास,
भोजन आणि स्थानिक वाहतूक यासह प्रति व्यक्ती ५३ हजार ५५० रुपये दर सांगितले त्यानुसार ठाणेदार यांच्यासह त्यांच्या मित्रांनी सात जणांसाठी तब्बल ३ लाख ७४ हजार रुपये कंपनीच्या खात्यावर जमा केले. कंपनीकडून पावत्या देत १० मार्चला पुणे-गुवाहाटी विमान प्रवासाचे आश्वासन दिले. मात्र, सहलीच्या अवघ्या दोन दिवस आधी कंपनीचे मालक जयदीप काशीकर यांनी हवामान खराब असल्याचे कारण देत सहल रद्द झाल्याचा संदेश पाठविला, त्यानंतर पुढेही केवळ आश्वासनेच मिळत राहिली.
शेवटी त्रस्त ज्येष्ठ नागरिकांनी कंपनीच्या कार्यालयात धाव घेतल्यानंतर त्यांना धनादेश देण्यात आला. मात्र, पाहिला आणि दुसराही धनादेश बाऊन्स झाला. त्यानंतर कंपनीचे कार्यालय बंद तसेच मालकाचा मोबाइलही बंद झाला, अशाच प्रकारे अनेक ग्राहकांचीही फसवणूक झाल्याची बाब समोर आली. या प्रकरणी जयदीप श्रीरंग काशीकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून नांदेड सिटी पोलीस अधिक तपास करीत आहेत.





