प्रभात वृत्तसेवा पुणे : महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास शेवटचे दोन दिवस बाकी असताना अद्यापही भाजप-शिवसेनेतील जागा वाटपाचा तिढा सुटेलला नाही. हा तिढा जागा वाटप अथवा कोणी किती जागा लढवायच्या यावर नसून हा तिढा शिवसेनेचे महानगर प्रमुख माजी आमदार रविंद्र धंगेकर असल्याचे समोर आले आहे.रविंद्र धंगेकर यांनी प्रभाग २४ मध्ये दोन जागांची मागणी केली असून भाजपने या जागा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे महायुतीचे जागा वाटप अद्यापही निश्चित झालेले नाही. शिवसेनेकडे २०१७ मधील केवळ २ माजी नगरसेवक आहेत. त्यामुळे भाजपने त्या जागांच्या टक्केवारीचा हवाला देत शिवसेनेला कमीत कमी जागा देणार असल्याचा दावा करत धंगेकरांना रोखण्याची खेळी भाजपने केली आहे. त्यामुळे, आता नाराज धंगेकरांकडून पुन्हा भाजपवर निशाना साधण्यास सुरूवात केली आहे. निवडणूकीच्या काही महिने आधी रविंद्र धंगेकर यांनी पुण्यातील जैन मंदिराच्या जागा विक्रीवरून केंद्रीयमंत्री मुरलीधर मोहोळ यांना लक्ष्य करत भाजपवर टीका केली होती. २०१७ मध्ये धंगेकर यांनी भाजपचे विद्यमान निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांचा पराभव केला होता. त्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय वाद अनेकदा पहायला मिळाला आहे. त्यामुळे, या निवडणुकीत खासदार मोहोळ आणि बिडकर यांच्याकडून धंगेकरांना रोखण्याची रणनिती आधीच आखली होती. पुण्यात महायुती होणार असल्याचे सांगत याचे अधिकार मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्थानिक पातळीवर दिले. पुण्याच्या निवडणुकीची जबाबदारी पक्षाने मोहोळ, बिडकर यांच्याकडे दिली आहे. त्यांनी महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकर शिवसेनेचे महानगर प्रमुख असले तरी युतीच्या कोणत्याही बैठकीत ते असणार नाही, असा पवित्रा घेतला. त्यामुळे शिवसेनेला नाईलाजास्तव धंगेकर यांना चर्चेतून बाहेर ठेवावे लागले. त्यानंतर आता महायुतीच्या जागा वाटपात धंगेकर यांनी मागणी केलेल्या जागेवर भाजपने दावा करत त्या देण्य़ास नकार दिला आहे. या जागा दिल्यास इतर जागा मोठ्या प्रमाणावर कमी करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेची चांगलीच कोंडी झाली असून आघाडीचा निर्णय झालेला असला तरी अद्यापही जागा वाटप रखडलेले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.