Vasai-Virar Municipal Corporation Election : वसई-विरार महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय वातावरण तापले असून महायुतीमधील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला आहे. “भाजपने आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे,” असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष राजाराम मुळीक यांनी केला आहे. जागावाटपात राष्ट्रवादीला पूर्णपणे डावलल्यामुळे आता पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे महायुतीमध्ये उभी फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. बैठकांचा बनाव आणि विश्वासघात – निवडणूक जाहीर झाल्यापासून महायुतीत एकत्रित लढण्याबाबत अनेक बैठका झाल्या. या बैठकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने समन्वयाची भूमिका घेतली होती. मात्र, प्रत्यक्ष जागावाटपाची वेळ आली तेव्हा भाजपने राष्ट्रवादीला एकही जागा न देता वाऱ्यावर सोडले. “जो पक्ष आपल्या सहकाऱ्यांशी प्रामाणिक राहत नाही, तो जनतेशी काय प्रामाणिक राहणार?” असा सवाल मुळीक यांनी उपस्थित केला आहे. केवळ कागदावर युती दाखवून भाजपने आमची दिशाभूल केल्याचा आरोप त्यांनी केला. “उमेदवार फोडले, हीच आमची ताकद” भाजपवर हल्लाबोल करताना मुळीक पुढे म्हणाले की, “आमच्या पक्षाची ताकद नसती तर भाजपने आमचे उमेदवार फोडण्याचे प्रयत्न केले नसते. आमचे उमेदवार पळवले जाणे हीच राष्ट्रवादीची ताकद अधोरेखित करते.” कोणत्याही परिस्थितीत पक्ष मागे हटणार नाही आणि आता पूर्ण ताकदीनिशी स्वतंत्रपणे मैदानात उतरणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. ठाकरे गटाचीही स्वबळाची गर्जना दुसरीकडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटानेही स्वतंत्र लढण्याचे संकेत दिले आहेत. ठाकरे गटाकडून आज सुमारे १०० इच्छुक उमेदवारांना ‘एबी’ फॉर्मचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे महाविकास आघाडीतही वसई-विरारमध्ये बिघाडी झाल्याचे चित्र असून, बहुजन विकास आघाडी, काँग्रेस आणि मनसे यांच्यातील संभाव्य युतीबाबतही आता अनिश्चितता निर्माण झाली आहे. सध्या वसई-विरारमध्ये भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांची युती निश्चित मानली जात आहे. मात्र, राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि ठाकरे गट स्वतंत्र लढणार असल्याने ही निवडणूक बहुकोणीय आणि अत्यंत चुरशीची होणार आहे. महानगरपालिकेची सद्यस्थिती: एकूण जागा: ११५ (२९ प्रभाग) आरक्षण: ५८ जागा महिलांसाठी, ५७ जागा पुरुषांसाठी. २०१५ चा निकाल: बहुजन विकास आघाडी (१०६), शिवसेना (०५), भाजप (०१). प्रशासक राजवट: २८ जून २०२० पासून नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्याने प्रशासकीय कारभार सुरू आहे. गेल्या निवडणुकीत एकतर्फी वर्चस्व गाजवणाऱ्या बहुजन विकास आघाडीसमोर यंदा बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. मित्रपक्षांनीच एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकल्याने वसई-विरारच्या सत्तेच्या चाव्या कोणाकडे जाणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.