Mahayuti Politics : विधान परिषदेतील पराभवानंतर महायुतीचा मोठा निर्णय; पुढील दोन दिवसांत….
Mahayuti Politics : विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर महायुतीत मंथन होणार आहे. फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार यांची बैठक होणार असून पुणे, संभाजीनगर आणि अमरावतीच्या निकालावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

Mahayuti Politics : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का बसला आहे. महायुतीला केवळ दोन जागा जिंकता आल्या, तर महाविकास आघाडीने तीन जागांवर विजय मिळवला. या निकालानंतर महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा समोर आले आहेत. त्यामुळे पराभवाची कारणे आणि पुढील रणनीतीवर चर्चा करण्यासाठी येत्या एक-दोन दिवसांत महायुतीची बैठक होणार आहे.
या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार उपस्थित राहणार आहेत. निवडणुकीतील पराभवाचे विश्लेषण, तिन्ही पक्षांतील वाद आणि भविष्यातील डॅमेज कंट्रोल यावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
पुणे, संभाजीनगरच्या निकालावर विशेष चर्चा –
महायुतीच्या बैठकीत पुणे आणि संभाजीनगरमधील पराभवावर विशेष चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे. या दोन्ही ठिकाणी झालेल्या पराभवाची कारणे तपासली जाणार आहेत. त्याचवेळी शिंदे गटाकडून अमरावतीचा मुद्दा बैठकीत मांडला जाण्याची शक्यता आहे. अब्दुल सत्तार यांच्या भूमिकेचाही मुद्दा राष्ट्रवादीकडून उपस्थित केला जाऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली.
महायुतीत आरोप-प्रत्यारोप –
शिंदे सेनेचे आनंद परांजपे यांनी अमरावती आणि संभाजीनगरमध्ये भाजपच्या नेत्यांनी महायुतीच्या उमेदवारांविरोधात प्रचार केल्याचा आरोप केला. तर शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आपण उघडपणे शरद पवार गटाचा प्रचार केल्याचा आरोप आहे. तसेच पुण्यातील शिंदे सेनेचे रविंद्र धंगेकर यांच्या भूमिकेवरही भाजपने आक्षेप घेतला आहे.
या आरोप-प्रत्यारोपांमुळे महायुतीतील मतभेद अधिक तीव्र झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता होणाऱ्या बैठकीत तिन्ही पक्षांचे नेते कोणता निर्णय घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. काही नेत्यांची पक्षातून हकालपट्टी होणार की केवळ समज दिली जाईल हे पाहणे महत्वाचे आहे.





