PMC Contract Workers: वेतन वाढले; पण लाभच गेले! महापालिकेच्या ११ हजार कंत्राटी कामगारांना फटका
PMC Contract Workers: महिन्याला अवघ्या ३१५ रुपयांच्या वेतनवाढीमुळे बोनसचे नुकसान; अतिरिक्त महापालिका आयुक्तांचे सर्व विभागप्रमुखांना स्पष्ट निर्देश.

PMC Contract Workers – राज्य सरकारने जुलै २०२६ मध्ये कंत्राटी कामगारांच्या विशेष भत्त्यात वाढ केल्याने पुणे महापालिकेतील हजारो कंत्राटी कामगारांचे वेतन वाढले परंतु, वेतनाची रक्कम २१ हजार रुपयांच्या मर्यादेपेक्षा अधिक झाल्याने या कामगारांना आता कर्मचारी राज्य विमा योजना (ईएसआयसी ) आणि दिवाळी बोनसच्या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे वेतन वाढले, पण लाभच गेले, अशी विचित्र स्थिती निर्माण झाली आहे.
या कर्मचाऱ्यांना जुलै पूर्वी २० हजार ९८५ रुपये वेतन होते त्यात, अवघ्या ३१५ रुपयांची वाढ झाली, आता २१,३०० रुपये वेतन मिळणार आहे. या तांत्रिक बाबीचा पालिकेत सुमारे ११ हजार सर्वसामान्य कामगारांना मोठा झटका बसला आहे. या कामगारांचे वेतन शासनाच्या नियमानुसार २१ हजारांच्या आत असल्याने पालिकेकडून मागील वर्षापासून त्यांना दरमहिन्याला बोनस, घरभाडे, रजा वेतन दिले जात होते.
मात्र, वेतन २१ हजारांपुढे गेल्याने ठेकेदारांना बोनसची रक्कम देण्यात येवू नयेत, असे आदेश काढले आहेत. गेल्या वर्षी प्रथमच पालिकेतील सुमारे ११ हजारांहून अधिक कंत्राटी कामगारांना दिवाळी बोनस देण्यात आला होता. त्यामुळे यंदाही बोनसची अपेक्षा असताना नव्या वेतनरचनेमुळे बोनसची तरतूदच लागू होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रजित नायर यांनी १० ऑगस्टला सर्व विभागप्रमुखांना परिपत्रक काढून नव्या स्थितीबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत.
२० हजारांचा बोनसवर पाणी….
कंत्राटी कामगारांचे वेतन वाढविण्याचा निर्णय स्वागतार्ह असला, तरी त्याच निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. या कामगारांना महिन्याला अवघे ३१५ रुपयांचे वेतन वाढणार असून वर्षाची ही रक्कम अवघी ३७८० रुपये होते. मात्र, त्याच वेळी त्यांना दिला जाणारा बोनस प्रत्येक महिन्याला १७४८ रुपये होता.
म्हणजे वर्षाला त्यांना दिवाळीसाठी सरासरी २० ते २१ हजार रुपये मिळणार होते. मात्र, आता साडेतीन हजारांच्या वाढीसाठी २० हजारांचा बोनसवर पाणी सोडावे लागणार आहे. तसेच, ईएसआयसी मुळे कामगारांना व कुटूंबाला अमर्यादीत खर्चाचे उपचार मिळत होते. ते आता पूर्णपणे बंद होणार असून उपचारासाठी पदरमोड करावी लागणार आहे.





