Sukhbir Singh Badal Attack: नांदेड हल्ल्याचे पुणे कनेक्शन उघड! सुखबीर सिंह बादल हल्ला प्रकरणात कुटुंबीयांची चौकशी
Sukhbir Singh Badal Attack: पुणे आणि नांदेड पोलिसांसह एटीएसच्या समन्वयातून तपासाला वेग; आरोपीच्या हालचाली आणि नेटवर्कबाबत गुन्हे शाखेकडून महत्त्वाची चौकशी.

Sukhbir Singh Badal Attack – शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख व पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये झालेल्या हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे पुणे कनेक्शन उघड झाल्यानंतर पुणे पोलिसांची गुन्हे शाखा आणि दहशतवादविरोधी पथक (एटीएस) तातडीने सक्रिय झाले. आरोपी मूळचा पुणे शहरातील सोलापूर बाजार परिसरातील रहिवासी असून त्याच्या कुटुंबीयांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी लहानपणापासून सोलापूर बाजार परिसरात राहत होता. त्याने वकिलीचे शिक्षण घेतले होते. मात्र, तो वकिली करीत नव्हता. त्याने घरासमोर स्नॅक सेंटर सुरू केले होते. व्यवसायात अपेक्षित यश न मिळाल्याने ते काही काळातच बंद केले. त्यानंतर सुमारे दोन वर्षांपूर्वी तो एकटाच नांदेडला जाऊन राहू लागला.
त्याची पत्नी आजही पुण्यातील लष्कर परिसरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे, तर विवाहित मुलगी लुल्लानगर येथे पतीसह वास्तव्यास आहे. हल्ल्याची माहिती मिळताच पुणे गुन्हे शाखा आणि एटीएसची पथके आरोपीच्या सोलापूर बाजार येथील घरी पोहोचली. पोलिसांनी कुटुंबीय व नातेवाइकांकडून आरोपीच्या हालचाली, संपर्क आणि नांदेडला जाण्यामागील कारणांची माहिती घेतली.
दरम्यान, आरोपी मागील दोन वर्षांपासून नांदेड येथे राहत होता. त्याच्या कुटुंबीयांकडून आवश्यक माहिती घेतली जात आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त गौहर हसन यांनी दिली. आरोपीला अटक करण्यात आली असून, हल्ल्यामागील नेमका हेतू, त्याचे संभाव्य संबंध आणि इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा सर्वंकष तपास सुरू आहे. पुणे आणि नांदेड पोलिसांसह एटीएसच्या समन्वयातून तपासाला वेग आला असून, या प्रकरणातील पुढील धागेदोरे शोधण्यावर भर दिला जात आहे.




