PMC Care: ‘पीएमसी केअर’ तर केअरलेस! पुणेकरांच्या १५ हजार तक्रारींना प्रशासनाने दाखवला कात्रजचा घाट
PMC Care: एसआयआरच्या कामाचे कारण पुढे करत महापालिकेकडून जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न; १५ क्षेत्रीय कार्यालयांसह ४३ विभागांत तक्रारींचा खच.

PMC Care – नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी पालिकेने उभारलेल्या पीएमसी केअर २.० या तक्रार निवारण प्रणालीवर नागरिकांच्या तब्बल १५ हजार तक्रारी प्रलंबित आहेत. कर्मचाऱ्यांच्या बदल्या, एसआयआर आणि तक्रार निवारणाची जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्यांचा वेळकाढूपणा यामुळे ही स्थिती उद्भवल्याचे प्रशासन सांगत आपली जबाबदारी टाळत आहे.
काय आहे पीएमसी केअर २.०
नागरिकांना दैनंदिन समस्यांच्या तक्रारी एका क्लिकवर करता याव्यात यासाठी पालिकेने ही तक्रार निवारण प्रणाली सुरू केली. पालिकेच्या सोशल मिडीया, संकेतस्थळ, मोबाईल ॲप, व्हॉट्स अप, काॅलसेंटर अशा नऊ माध्यमातून नागरिकांना अतिक्रमणे, रस्ते, ड्रेनेज, अनधिकृत बांधकामाबाबत तक्रारी करता येतात. या तक्रारी एकत्र करून संबधित विभागाकडे पाठविल्या जातात.
तेथील नोडल अधिकारी तक्रारी वर्गवारीनुसार संबधित क्षेत्रीय कार्यालय, मुख्य खाते तसेच त्यांच्या अभियंत्याकडे पाठवितात. तक्रारी कशा सोडविल्या याची माहिती संबधितांना कळवायची असते. गेल्या दोन महिन्यांपासून केवळ तक्रारीच केल्या जात असून त्या पुढे पाठविल्याच गेल्या नाहीत. तक्रारी सोडविल्या जात नसल्याने प्रलंबित तक्रारींचा आकडा १४ हजार ६४४ एवढा झाला आहे. १५ क्षेत्रीय कार्यालयांसह सुमारे ४३ विभागांकडे या तक्रारी आलेल्या आहेत.
क्षेत्रीय कार्यालयांत सर्वाधिक तक्रारी
सर्वाधिक २ हजार १० तक्रारी कोंढवा-येवलेवाडी विभागाकडे आहेत. त्यापाठोपाठ सिंहगड रस्ता विभागाकडे १ हजार ८८५, ढोलेपाटील विभागाकडे १ हजार ८१३, औंध-बाणेरकडे १ हजार ६७५, नगर रस्ता-वडगावशेरीकडे १ हजार ३२८, तर आरोग्य विभागाकडे १ हजार २४८ तक्रारी प्रलंबित आहेत. याशिवाय येरवडा-कळस-धानोरीकडे ९५५, भवानी पेठेकडे ८४८ आणि पाणीपुरवठा विभागाकडे ७१६ तक्रारी प्रलंबित आहेत.
याशिवाय धनकवडी-सहकारनगर ६०८, कोथरूड-बावधन ३१०, रस्ता विभाग २६२, मुख्य अभियंता प्रकल्प १३४, अतिक्रमण १०६, पर्यावरण ९७, वानवडी-रामटेकडी ८३, सामान्य प्रशासन/आस्थापना ७१, बांधकाम परवानगी ६३, ड्रेनेज ५४, वारजे-कर्वेनगर ५१ अशा तक्रारी आहेत.
“गेल्या काही दिवसांत अनेकांकडे निवडणूक यादी सुधारणा कामाची जबाबदारी आली आहे. तसेच, पालिकेतील नेहमीच्या बदल्यांमुळे काही कार्यालयांमध्ये नवीन कर्मचारी आले आहेत. परिणामी, तक्रारी प्रलंबित आहेत. या कामाच्या नियोजनासाठी लवकरच बैठका घेतल्या जाणार आहेत.”
– राहूल जगताप ( माहिती व तंत्रज्ञान विभाग प्रमुख)






