Devendra Fadnavis: “गणेशोत्सव सांस्कृतिक पद्धतीनेच झाला पाहिजे!”; डीजे समर्थकांना देवेंद्र फडणवीसांचा अप्रत्यक्ष इशारा
Devendra Fadnavis: भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक वक्तव्य; उत्सव सांस्कृतिक पद्धतीने साजरा करण्याचे पुणेकरांना आवाहन.

Devendra Fadnavis – सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी पुण्यातूनच केली आहे. हा उत्सव सांस्कृतिक पद्धतीनेच साजरा केला पाहिजे. तो तसाच साजरा केला जातो, हे पुणेकरांनीच संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिले पाहिजे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या समारोपाच्या भाषणात एका दगडात अनेक पक्षी मारलेच; याशिवाय डीजेच्या बाजूने असलेल्यांना अप्रत्यक्षरीत्या कानपिचक्याही दिल्या.
त्यामुळे आता भाजपचे वर्चस्व असलेली गणेशमंडळे कोणता निर्णय घेतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. महापालिकेमध्ये झालेल्या गणेशमंडळांच्या बैठकीत डीजे आणि ढोलांना विरोध करणाऱ्या व्यक्तीला हाताला धरून बाहेर काढण्यात आले, तसेच भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी ढोल- ताशे आणि डीजेच्या बाजूने आपला कौल देत, यावर निर्बंध टाकायचे नाहीत, अशी स्पष्ट भूमिकाघेतली. त्यामध्ये भाजपचे अनेक वरिष्ठ नेत्यांच्या समावेश आहे.
भाजपने ही भूमिका घेतल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) यांनी ध्वनिप्रदूषण व्हायला नको, नागरिकांची भावना महत्त्वाची आहे, असा पवित्रा घेत डीजेला विरोध दर्शवला. पुण्यात होणारा डीजेचा वाढता विरोध हा थेट राज्यापर्यंत पोहोचला आणि भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी डीजेविषयी आपली भूमिका सांगून टाकली.
मुख्यमंत्र्यांनीच ही भूमिका व्यक्त केल्याने आणि अप्रत्यक्षरीत्या डीजे आणि एकूणच ध्वनिप्रदूषणाच्या विरोधात मत मांडल्याने आता शहरातील भाजप कार्यकर्ते काय उपाययोजना करतील, खरेच हा उत्सव सांस्कृतिक पद्धतीने साजरा होईल, की मुख्यमंत्र्यांच्याच वक्तव्याला हरताळ फासणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.





