Bhor News: पसुरे गावातील स्मशानभूमीला जलसमाधी! कमरेएवढ्या पाण्यातून मृतदेह नेण्याची वेळ
Bhor News: किनाऱ्यापासून कमरेएवढ्या पाण्यातून ५० फूट चालत मृतदेह आणि लाकडांची वाहतूक; ग्रामस्थांची अंत्यविधीसाठी मोठी दमछाक.

Bhor News – भोर तालुक्यातील भाटघर धरणाच्या किनाऱ्यावर वसलेल्या पसुरे गावातील स्मशानभूमी धरणाच्या पाण्यात गेल्याने अंत्यसंस्कारासाठी नातेवाईक आणि गावकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. किनाऱ्यापासून कमरेएवढ्या पाण्यातून सुमारे ५० फूट चालत मृतदेह, लाकडे, अंत्यविधी साहित्य स्मशानभूमीत न्यावे लागत असल्याने धरणग्रस्तांना मृत्यूनंतरही यातना भोगाव्या लागत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.
चार दिवसांपूर्वी पसुरे येथील एका नागरिकाचे निधन झाले. सध्या भाटघर धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे पाण्याच्या फुगवट्यामुळे येथील स्मशानभूमी चोहोबाजूने पाण्याने वेढली गेली आहे. स्मशानभूमीच्या चारही बाजूंना सुरक्षा कठडा नसून, सभोवताली १० ते १२ फूट खोल पाणी आहे. स्मशानभूमीच्या पृष्ठभागावर उभे राहण्यासाठी अवघ्या १० ते १५ जणांचीच जागा शिल्लक राहिल्याने उर्वरित नागरिकांना किनाऱ्यावर उभे राहूनच आप्तजणांना अखेरचा निरोप द्यावा लागला. याप्रसंगी स्मशानभूमीत उभे असताना कोणाचा तोल गेल्यास मोठ्या दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली आहे.
डोक्यावरून सरपणाची वाहतूक
अंत्यविधीसाठी लागणारी लाकडे आणि इतर साहित्य किनाऱ्यापासून कमरेएवढ्या पाण्यातून ५० फूट चालत डोक्यावरून न्यावे लागले. या वेळी उपस्थितांची मोठी दमछाक झाली. मृतदेह पाण्यातून नेताना आणि तोल सांभाळताना गावकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागली.
प्रशासनाविरोधात संताप
या भयानक परिस्थितीमुळे अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. धरण बांधताना आमच्या जमिनी संपादित केल्या. मात्र, त्याचा मोबदला किंवा इतर कोणताही लाभ आम्हाला मिळाला नाही. जमिनी गेल्यामुळे आमची आर्थिक बाजू कमकुवत झाली आणि हयातभर संकटांचा सामना करावा लागला. आता मृत्यूनंतरही प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आमच्या नशिबी यातनाच आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली.





