Medha Kulkarni: “डीजे, लेझर अन् प्लाझ्मावर बंदी आणावी!”; गणेशोत्सवाबाबत खासदार डॉ. मेधा कुलकर्णींचे मोठे विधान
Medha Kulkarni: पुण्याने महाराष्ट्रासाठी गणेशोत्सवाचा आदर्श 'पुणे पॅटर्न' तयार करावा; खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांचे डीजे व लेझर लाईटविरोधात रोखठोक वक्तव्य.

Medha Kulkarni – पुण्याने महाराष्ट्रासाठी गणेशोत्सवाचा आदर्श घालून देणारा पुणे पॅटर्न तयार करावा. कोणत्याही जाती- धर्माचा सण, उत्सव असला, तरी कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी. डीजे, प्लाझ्मा, लेझर लाईटसारख्या गोष्टींवर पूर्णपणे बंदी आणावी, असे मत राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले. गेल्या अनेक वर्षांपासून डीजे, गोंगाट आणि उत्सवाला गालबोट लावणाऱ्या गोष्टींविरोधात भूमिका मांडत आले आहे.
त्यामुळे केवळ गणेशोत्सवच नाही, तर कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही डीजेचा दणदणाट बंद व्हावा, असे मला वाटते. सण-उत्सवांच्या काळात वाजणाऱ्या कर्णकर्कश डीजेमुळे लहान मुले, वृद्ध नागरिक, उच्च रक्तदाब आणि इतर गंभीर आजारांनी ग्रस्त असणाऱ्या रुग्णांना तीव्र त्रास सहन करावा लागतो. गोंगाटामुळे उत्सवाच्या काळात नागरिकांना शहरातून स्थलांतरित होण्याची वेळ येऊ देऊ नये.
न्यायालयाने घालून दिलेल्या आवाजाच्या मर्यादा आणि नियमांचे काटेकोर पालन करावे. गणेशोत्सवाच्या काळात गुटख्याच्या किंवा आरोग्यास घातक असणाऱ्या उत्पादनांच्या सरोगेट (छुप्या) जाहिराती स्वीकारू नयेत, असे मत कुलकर्णी यांनी मांडले. पुण्यातील सुमारे २०० गणेश मंडळांनी यंदा डीजे न वापरता विधायक व पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यांचे अनुकरण इतर मंडळांनीही करावे आणि हा उत्सव समाजातील सगळ्यांनाच सुसह्य कसा होईल, याकडे लक्ष द्यायला हवे, असे कुलकर्णी म्हणाल्या. काही जागरूक नागरिकांनी मांडलेली भूमिका समाजाच्या हिताची आहे. त्यामुळे ते आस्तिक आहेत की नास्तिक आहेत, याच्याशी संबंध जोडू नये. लोकप्रतिनिधींनी उत्सवांचे स्वरूप, नागरिकांना होणारा त्रास समजून घेत सुज्ञपणे भूमिका मांडाव्यात, असेही कुलकर्णी म्हणाल्या.





