Pimpalwandi Case: पिंपळवंडीत संतापाचा उद्रेक! पुणे-नाशिक महामार्ग रोखला; गाव बंद ठेवून ग्रामस्थांचा निषेध
Pimpalwandi Case: प्रकरण जलदगती न्यायालयात चालवणार आणि पीडित कुटुंबाला आर्थिक मदत देणार; नायब तहसीलदारांच्या लेखी आश्वासनानंतर रास्ता रोको मागे.
Pimpalwandi Case – पिंपळवंडी (ता. जुन्नर) येथे सुमारे दहा वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या धक्कादायक घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे. घटनेच्या निषेधार्थ बुधवारी (दि. 19) पिंपळवंडी गाव बंद ठेवण्यात आले. संतप्त ग्रामस्थांनी पुणे-नाशिक महामार्गावरील पिंपळवंडी बसस्थानक परिसरात रास्ता रोको आंदोलन करून आरोपीला कठोरात कठोर, तसेच फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.
‘चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे’, ‘आरोपीला फाशी झालीच पाहिजे’, अशा घोषणा देत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. आंदोलनामुळे पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. मंगळवारी (दि. 18) पिंपळवंडी गावठाणातील लेंडे स्थळ परिसरात ही घटना घडल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप सिंगगिल यांनी रात्री घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. बुधवारी सकाळी ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून मोठ्या संख्येने महामार्गावर एकत्र येत रास्ता रोको आंदोलन केले. माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर,
पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांच्यासह पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. केवळ आरोपीवर कारवाई करून प्रश्न संपणार नाही, तर पीडित कुटुंबीयांचे पुनर्वसन करावे, शासनाकडून योग्य ती आर्थिक व इतर मदत मिळावी आणि कुटुंबीयांना न्याय मिळण्यासाठी ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. जोपर्यंत शासनाकडून लेखी आश्वासन मिळत नाही,
तोपर्यंत रास्ता रोको मागे घेणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली. या आंदोलनावेळी माजी सभापती रघुनाथ लेंडे, संगमनेर भाजपा तालुकाध्यक्ष योगेश सूर्यवंशी, जिल्हा परिषद सदस्य मंगेश काकडे, सरपंच मेघाताई काकडे, माजी सभापती संगीता वाघ, सुप्रिया लेंडे, मोनाली खोंड यांच्यासह पिंपळवंडी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नायब तहसीलदारांचे आश्वासन
अखेर नायब तहसीलदार सचिन मुंडे यांनी घटनास्थळी येऊन पीडित कुटुंबीयांना शासनाच्या वतीने आवश्यक ती मदत आणि योग्य ती कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतले. अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत आरोपीविरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्यानुसार कारवाई करण्यात आली असून, हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगितले.






