Rahul Gandhi : “विद्यार्थ्यांवरील अत्याचाराला अमित शहा जबाबदार, महिलांवर बळाचा वापर केला”; राहुल गांधींचा जोरदार हल्लाबोल
मारहाण करण्यात आली, धमकावण्यात आले आणि काही जणांवर पेलेट गनचाही वापर करण्यात आला. या सर्व हिंसाचाराला गृहमंत्री अमित शहा हेच जबाबदार आहे.

Rahul Gandhi – पेपर फुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कथित अत्याचारासाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गृहमंत्री अमित शहा यांना थेट जबाबदार धरले आहे. अमित शहा यांच्याकडे या संपूर्ण प्रकारावर संसदेत येऊन उत्तर देण्याचे किंवा स्पष्टीकरण देण्याचे धाडस नाही अशी टीका राहुल यांनी केली.
राहुल यांनी १०, जनपथ येथे २० जुलैच्या आंदोलनादरम्यान पोलिसांच्या कारवाईचा सामना करावा लागलेल्या विद्यार्थी आणि आंदोलकांची भेट घेतली व त्यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. आंदोलक तरुणांवर आणि महिलांवर बळाचा वापर करण्यात आला तसेच पॅलेट गन चालवण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
हे तरुण देश, संविधान आणि शिक्षणव्यवस्था वाचवण्यासाठी लढत होते. त्यांना मारहाण करण्यात आली, धमकावण्यात आले आणि काही जणांवर पेलेट गनचाही वापर करण्यात आला. या सर्व हिंसाचाराला गृहमंत्री अमित शहा हेच जबाबदार आहे.
या घटनेबाबत अमित शहा यांच्याकडे संसदेत येऊन बोलण्याचे औदार्य किंवा धाडस नाही. जर त्यांना या हिंसाचाराबद्दल माहिती नसेल तर ते अकार्यक्षम आहेत, आणि जर त्यांच्या आदेशाने हे झाले असेल तर ते दोषी आहेत अशी टीका त्यांनी केली.
पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनीही त्यांच्यासोबत घडलेला प्रकार सांगताना, आंदोलनानंतर सोशल मीडियावर होत असलेल्या ऑनलाइन छळाची माहिती दिली. राहुल गांधी यांनी या विद्यार्थ्यांच्या धैर्याचे कौतुक करत, शिक्षणव्यवस्थेतील त्रुटींवर आवाज उठवणे हा कोणताही गुन्हा नसल्याचे ठामपणे सांगितले.






