Phule Srushti Pimpri: पिंपरी चौकातील ‘फुले सृष्टी’चे काम २ वर्षांपासून ठप्प! शिवसेनेने महापालिका प्रशासनाला धरले धारेवर
Phule Srushti Pimpri: शहराच्या वैचारिक अन् सामाजिक वारशाचे प्रतीक असलेले स्मारक अपूर्ण राहणे नागरिकांच्या भावनांचा अपमान; शिवसेनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा.

Phule Srushti Pimpri- पिंपरी चौकातील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे काम गेल्या दोन वर्षांपासून अर्धवट अवस्थेत रखडले आहे. काही ठिकाणी शिल्प उभारण्यात आले असले, तरी अनेक ठिकाणी अद्याप काम पूर्ण झालेले नाही. महापालिका शहरातील विविध विकासकामांवर कोट्यवधी रुपये खर्च करीत असताना महापुरुषांच्या स्मारकाच्या कामाकडे दुर्लक्ष का,
असा सवाल उपस्थित करीत शिवसेनेने महापालिका प्रशासनाला जाब विचारला आहे. शिवसेनेचे भोसरी विधानसभा प्रमुख गणेश सुधाकर जाधव यांनी २८ सप्टेंबर रोजी महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन स्मारकाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे. पिंपरी चौकातील हे स्मारक शहराच्या सामाजिक आणि वैचारिक वारशाचे महत्त्वपूर्ण प्रतीक आहे.
महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी समाजातील वंचित घटकांच्या शिक्षणासाठी आणि समतेसाठी केलेले कार्य सर्वश्रुत आहे. अशा महामानवांच्या स्मारकाचे काम दोन वर्षांपासून अपूर्ण राहणे ही नागरिकांच्या भावनांशी निगडित बाब असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
२८ नोव्हेंबरपूर्वी काम पूर्ण करण्याची मागणी
येत्या २८ नोव्हेंबर रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृतिदिन आहे. त्यापूर्वी स्मारकाचे उर्वरित काम पूर्ण करून त्याचे लोकार्पण करण्यात यावे, अशी मागणी जाधव यांनी केली आहे. अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. स्मारकाच्या कामात नेमका विलंब कशामुळे होत आहे, काम पूर्ण करण्याची अंतिम मुदत काय आहे आणि प्रशासन याबाबत कोणती कार्यवाही करणार, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.





