Krantijyoti Savitribai Phule Child Care : गरजू बालकांच्या संगोपनासाठी दरमहा २,२५० रुपये; क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना
योजनेच्या लाभासाठी बालक महाराष्ट्राचा रहिवासी असणे आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजार रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

Krantijyoti Savitribai Phule Child Care : अनाथ, बेघर, एकल पालक असलेली तसेच गंभीर परिस्थितीत सापडलेली ० ते १८ वर्षे वयोगटातील पात्र बालके व त्यांच्या संगोपनकर्त्यांना महिला व बालविकास विभागाअंतर्गत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेच्या माध्यमातून दरमहा २,२५० रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते. पात्र बालकांच्या पालनपोषणासाठी ही रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (डीबीटी) लाभार्थी किंवा संगोपनकर्त्याच्या बँक खात्यात जमा केली जाते.
बालकांना बालगृहात ठेवण्याऐवजी नातेवाईकांकडे कौटुंबिक वातावरणात राहता यावे, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच त्यांना शिक्षण व आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने महिला व बालविकास विभाग विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून राज्यात ही योजना राबविली आहे.
अनाथ, बेघर, एक पालक असलेली, आजारी किंवा दिव्यांग पालकांची बालके, तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची मुले, कौटुंबिक हिंसाचार किंवा गंभीर आजाराने ग्रस्त पालकांची बालके, बालकामगार, रस्त्यावर राहणारी बालके तसेच बाल कल्याण समितीने काळजी व संरक्षणाची गरज असल्याचे घोषित केलेल्या बालकांना या योजनेचा लाभ मिळतो.
योजनेच्या लाभासाठी बालक महाराष्ट्राचा रहिवासी असणे आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजार रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना प्राधान्य देण्यात येते.
अर्जासोबत बालकाचा जन्मदाखला किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, बालक व पालक अथवा संगोपनकर्त्याच्या संलग्न खात्याचे बँक पासबुक आणि बालकाचा पालकांसमवेत घरासमोरील छायाचित्र सादर करावे. लागू असल्यास आई-वडिलांचा मृत्यू दाखला आणि शाळेत शिकत असलेल्या बालकाचे बोनाफाईड प्रमाणपत्रही जोडावे.




