Alandi News: विद्यार्थ्यांच्या मृत्यूने आळंदी शोकाकुल! नगराध्यक्षांच्या एका आवाहनावर व्यापाऱ्यांनी स्वतःहून बंद केली दुकाने
Alandi News: माऊली मंदिर परिसर, चाकण चौक अन् प्रदक्षिणामार्गावर शुकशुकाट; गेल्या ३०-४० वर्षांतील सर्वात मोठ्या शोकांतिकेने आळंदी सुन्न.

Alandi News- दिवेआगर (रायगड) येथे झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आज संपूर्ण आळंदीत उस्फूर्तपणे बंद पाळण्यात आला. विनर्स अकॅडमी या क्लास मधील आळंदीतील आठ विद्यार्थ्यांचा दिवेआगार या ठिकाणी काल बुडून मृत्यू झाल्यानंतर आज आळंदी मध्ये अत्यंत शोकाकुल वातावरणात सुमित भरत अहिरे, तन्मय दत्तात्रय वहिले, प्रणव रामदास बनसोडे, आणि कैवल्य सतीश वासनकर या चार विद्यार्थ्यांचा अंत्यविधी आळंदी येथील स्मशानभूमीत झाला.
शोकाकुल नातेवाईकांमुळे आणि मित्रपरिवारामुळे एकूणच अत्यंत धीर गंभीर वातावरणात हे सर्व अंत्यविधी पार पडले. कुटुंबीयांचा हृदय पिळवटून टाकणारा टाहो ऐकून उपस्थितांना गलबलून आले. आळंदी जवळील केळगाव या ठिकाणी सोहम तुकाराम भांडवलकर व राजवीर युवराज वहिले या विद्यार्थ्यांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. आणि यश किरण वानखेडे (अमरावती) व कौस्तुभ संदीप दौंड (श्रीरामपूर, अहिल्यानगर) या विद्यार्थ्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी गावी नेण्यात आले.
आळंदी नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत कुर्हाडे यांनी आळंदीकरांना केलेल्या उस्फूर्त बंदच्या आवाहनाला आळंदीत 100 टक्के प्रतिसाद मिळाला. दिवंगत विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नागरिक, व्यापारी, व्यावसायिक, विविध संस्था आणि आस्थापनांनी बंदमध्ये स्वयं स्फूर्तीने सहभाग घेतला. शहरातील नेहमीची व्यापारी वर्दळ कमी होऊन अनेक भागात शांत व शोकाकुल वातावरण दिसून आले.
महाद्वार चौक, माऊली मंदिर परिसर, चाकण चौक, वडगाव चौक, मरकळ चौक, दत्त मंदिर परिसर, नगरपरिषद चौक, प्रदक्षिणामार्ग या सर्व ठिकाणी एकदम शुकशुकाट होता. मागील 30 ते 40 वर्षात आळंदीत कधीही एकावेळी आणि एकाच दुर्घटनेत इतक्या संख्येने मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे आळंदीकरांना या घटनेचा मोठा धक्का बसला त्यामुळे या दुःखावरील साहजिक प्रतिक्रिया उस्फूर्तपणे बंदच्या स्वरूपात उमटली.
अद्याप गुन्हा दाखल नाही
आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.एस. नरके यांच्याशी संपर्क साधला असता अद्याप पर्यंत कोणावरही गुन्हा दाखल झाला नाही व कोणी तक्रारही केली नसल्याचे सांगितले.





