सातारा -आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे सातारा शहर व परिसरात “डॉल्बी’वाजविण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाकडून सशर्त मंजुरी देण्यात आली असून त्याबद्दल व्यावसायिकांनी आ. शिवेंद्रसिंहराजेंचे आभार मानण्यात आले.
शहर व परिसरामध्ये सात वर्षांपासून साऊंड सिस्टीम (डॉल्बी) वाजवण्यास स्थानिक प्रशासनाने परवानगी नाकारली होती. सातारा शहर वगळता जिल्ह्यातील इतर शहरांमध्ये साऊंड सिस्टीम (डॉल्बी) वाजवण्यास परवानगी आहे. या दुजाभावामुळे सातारा शहर व परिसरातील साऊंड, लाईट, जनरेटर व्यावसायिकांवर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार शासनाच्या अटी व निकषानुसार साऊंड, लाईट आणि जनरेटर या व्यावसायिकांना व्यवसाय करण्यासाठी परवानगी द्यावी अशी सूचनावजा मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्याकडे केली होती.
आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या सूचनेनुसार बन्सल यांनी डॉल्बीला सशर्त परवानगी दिली आहे. डॉल्बीला परवानगी मिळावी म्हणून साऊंड, लाईट आणि जनरेटर ओनर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आ. शिवेंद्रसिंहराजेंची यांची मंगळवारी भेट घेऊन मागणीचे निवेदन त्यांना दिले होते. दरम्यान, आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या सूचनेनंतर आज झालेल्या शांतता समतिीच्या बैठकीत डॉल्बीला परवानगी देण्याबाबत अधीक्षक बन्सल यांनी सकारात्मक निर्णय घेत डॉल्बीचे दोन बेस आणि दोन टॉप लावण्यास सशर्त परवानगी दिली.