जगात अनेक विचित्र आणि शापित गोष्टी आहेत. उत्तर कोरियातील हॉटेल हे त्यापैकीच एक. वास्तविक, उत्तर कोरियामध्ये असे एक हॉटेल आहे, ज्याला ‘शापित’ आणि ‘झपाटलेले’ म्हटले जाते. हॉटेल पिरॅमिडच्या आकाराच्या गगनचुंबी इमारतीच्या स्वरूपात बनवलेले आहे. मात्र, 33 वर्षे उलटून गेली तरी त्याचे बांधकाम अपूर्ण आहे. या हॉटेलचे अधिकृत नाव र्युगयोंग (Ryugyong) आहे, ते यु क्यून्ग (Yu-Kyung) म्हणूनही ओळखले जाते.
हॉटेलमध्ये आहेत 105 खोल्या
उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांगमध्ये असलेल्या या हॉटेलची उंची 330 मीटर आहे आणि त्यात 105 खोल्या आहेत. हे हॉटेल बाहेरून दिसायला अतिशय भव्य आणि आलिशान आहे. मात्र उत्तर कोरियातील लोक या हॉटेलला ‘भूत बिल्डिंग’ म्हणतात.
हॉटेलवर 55 ट्रिलियन रुपये खर्च
जपानच्या वृत्तानुसार, उत्तर कोरियाच्या सरकारने या हॉटेलच्या बांधकामासाठी खूप पैसा खर्च केला आहे. उत्तर कोरिया सरकारने या हॉटेलवर सुमारे 55 ट्रिलियन रुपये खर्च केले आहेत, परंतु आजपर्यंत हे हॉटेल पूर्ण झालेले नाही.
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये इमारतीची नोंद
आज जग या हॉटेलच्या इमारतीला ‘पृथ्वीवरील सर्वात उंच निर्जन इमारत’ म्हणून ओळखते. या हॉटेलच्या या वैशिष्ट्यामुळे त्याचे नाव ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंदवले गेले आहे. जर हे हॉटेल पूर्ण झाले तर ते जगातील सातव्या क्रमांकाची सर्वात उंच इमारत आणि जगातील सर्वात उंच आणि आलिशान हॉटेल म्हणून ओळखले जाईल.
1987 मध्ये बांधकाम सुरू झाले
या हॉटेलचे बांधकाम 1987 मध्ये सुरू झाले होते आणि ते पूर्ण करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी ठेवण्यात आला होता. त्याच्या बांधकामात अनेक समस्या येऊ लागल्या, त्यानंतर 1992 मध्ये त्याचे बांधकाम थांबवण्यात आले. मात्र, 2008 साली ते बनवण्याचे काम पुन्हा सुरू झाले आणि त्यावर 11 अब्ज रुपये खर्च झाले. तरीही हॉटेलचे बांधकाम पूर्ण होऊ शकले नाही.