PCMC News : चर्चेतले सगळेच बाद! स्थायी समितीच्या निवडीत भाजपची मोठी गुगली; १६ सदस्यांची नावे जाहीर
PCMC News : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विशेष सभेत स्थायी समितीचे १६ शिलेदार निश्चित; भाजपचे ११ तर राष्ट्रवादीचे ४ सदस्य, शिवसेनेला एक जागा.

PCMC News – पिंपरी-चिंचवड महापालिकेची तहकूब विशेष सभा शुक्रवारी (दि. २०) पार पडली. या सभेत स्थायी समितीच्या १६ सदस्यांची निवड जाहीर करण्यात आली. गटनेत्यांनी आपापल्या पक्षातील नगरसेवकांची नावे बंद लिफाफ्यातून महापौरांकडे सादर केली. मात्र, स्थायी समितीसाठी चर्चेत असलेल्या एकाचेही नाव यामध्ये नाही.
तर बड्या नगरसेवकांनी स्वतःहूनच महापालिकेत आर्थिक चणचण असताना रिकाम्या तिजोरीच्या चाव्या नाकारल्या असल्याची चर्चा आहे. स्थायी समितीत भाजपचे वर्चस्व कायम राहिले असून पक्षाकडून अभिषेक बारणे, शालिनी गुजर, मनीषा चिंचवडे, संदीप कस्पटे, सारिका गायकवाड, योगिता नागरगोजे, कृष्णा सुरकुले, अर्चना करांडे, मधुरा शिंदे, बाबा त्रिभुवन आणि शितल वर्णेकर यांची निवड करण्यात आली आहे.
तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सविता आसवानी, संतोष कोकणे, संदीप वाघेरे आणि विकास साने यांना स्थायी समितीवर संधी देण्यात आली आहे. तर शिवसेनेकडून सुलभा उबाळे यांची निवड जाहीर करण्यात आली. सभेत कोणताही वाद न होता प्रक्रिया पार पडली.
स्थायी समिती ही महापालिकेतील महत्त्वाची निर्णयप्रक्रिया करणारी समिती मानली जाते. स्थायी समिती सदस्यपदी तसेच सभापती पद मिळण्यासाठी अनेकांनी फिल्डींग लावली होती. मात्र, चर्चेत असलेल्या नावांवर पक्षाने फुली मारली असल्याचे समोर आले आहे.





