PMC News : एका मिनिटाचा उशीर ठरणार भारी! स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होणार?
PMC News : उमेदवार अमोल बालवडकर यांना वाहतूक कोंडीचा फटका; वेळेच्या मर्यादेनंतर अर्ज दाखल झाल्याने पेच वाढला.

PMC News – महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता निर्माण झाली असून, अध्यक्षपदासाठी भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी सादर केलेला अर्ज विहित वेळेच्या एक मिनिट उशिराने दाखल झाला आहे. त्यामुळे या अर्जाबाबत आता पीठासन अधिकारी निर्णय घेणार आहेत.
अर्ज मुदतीनंतर तो छाननीमध्ये बाद झाल्यास भाजपचे उमेदवार श्रीनाथ भिमाले हे स्थायी समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडून येणार आहेत. महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी पुढील आठवड्यात सोमवारी (दि. २३) निवडणूक होणार आहे. या १६ सदस्यांच्या समितीत पक्षीय बलाबलानुसार भाजपचे १२ सदस्य अ असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन, तर काँग्रेसच्या एका सदस्याचा समावेश आहे.
त्यामुळे भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात राष्ट्रवादीच अर्ज भरू शकते. उमेदवाराच्या अर्जासोबत सूचक आणि अनुमोदकाची सही आवश्यक असते. विरोधकांचे चार नगरसेवक आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीने अर्ज भरण्याची तयारी केली होती. त्यानुसार पक्षाने सुहास टिंगरे यांना उमेदवारी दिली.
त्यावर सूचक आणि अनुमोदक म्हणून स्वाक्षरी करण्यासाठी माजी महापौर वैशाली बनकर, तसेच अमोल बालवडकर येणार होते. अर्ज भरण्याची मुदत सकाळी ११ ते दुपारी १ होती. मात्र, बालवडकर यांना वाहतूक कोंडीमुळे महापालिकेत पोहोचण्यासाठी एक मिनिट उशीर झाल्याने सुहास टिंगरे यांचा अर्ज १ वाजून १ मिनिटांनी दाखल झाला.
प्रशासनाने तो दाखल करून घेतला असला, तरी निवडणुकीच्या वेळी पीठासन अधिकारी छाननीत अर्ज वैध ठरवणार की अवैध, यावर आता ही निवडणूक होणार की नाही, हे स्पष्ट होईल. या निवडणूकीसाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
“आमच्या घड्याळातील वेळेनुसार आम्ही एक वाजता अर्ज भरण्यासाठी दाखल झालो. मात्र, प्रशासनाच्या घड्याळात १ मिनिट जास्त वेळ झालेला होता. त्यामुळे आम्ही कार्यालयात वेळोत पोहोचलो असून, ही बाब निवडणुकीच्या वेळी निदर्शनास आणून देणार आहोत.”
– ऍड. नीलेश निकम, विरोधी पक्षनेते





