Payal Nag Gold Medal : पायल नागची कमाल! जागतिक विजेत्या शीतल देवीला नमवत पटकावलं सुवर्णपदक
Payal Nag Gold Medal : आर्चरी पॅरा सिरीज २०२६ मध्ये भारताच्या पायल नाग हिने महिला कंपाउंड प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.

Payal Nag Gold Medal Para Archery 2026 : भारतीय पॅरा-धनुर्विद्येला (Para Archery) एक नवा चमकता तारा मिळाला आहे. आर्चरी पॅरा सिरीज २०२६ मध्ये भारताच्या पायल नाग हिने महिला कंपाउंड प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. विशेष म्हणजे, अंतिम फेरीत तिने भारताचीच जागतिक कीर्तीची तिरंदाज शीतल देवी हिला पराभूत करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
आर्चरी पॅरा सिरीज २०२६ च्या महिला कंपाउंड अंतिम सामन्यात एक मोठी उलटफेर पाहायला मिळाली. भारताच्या दोन अव्वल तिरंदाजांमध्ये रंगलेल्या या अटीतटीच्या लढतीत पायल नागने संयमी खेळाचे प्रदर्शन करत १३९–१३६ अशा फरकाने विजय मिळवला. पायलचे हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील पहिलेच पदक असून, पहिल्याच प्रयत्नात तिने सुवर्णवेध घेतल्याने क्रीडा वर्तुळात तिचे कौतुक होत आहे.
काटे की टक्कर!
India’s Payal Nag won a gold medal at the World Archery Para Series 2026 in Bangkok, defeating reigning world champion Sheetal Devi. #TheSentinel #payalNag #Gold pic.twitter.com/FDnbVOWBvy
— The Sentinel (@Sentinel_Assam) April 4, 2026
अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास दोन्ही खेळाडूंसाठी नेत्रदीपक होता. उपांत्य फेरीत शीतल देवीने सिंगापूरच्या नूर शाहिदा अलीमचा १४७–१४२ असा पराभव केला होता, तर पायलने ऐतिमोवावर १४४–१४० अशी मात करून अंतिम फेरीत धडक मारली होती. २०२५ ची ‘पॅरा आर्चर ऑफ द इयर’ ठरलेली शीतल देवी या सामन्यात प्रबळ दावेदार मानली जात होती, मात्र पायलच्या अचूक निशाण्यापुढे तिची झुंज अपयशी ठरली.
भारतीय खेळाडूंचा पदकांचा पाऊस –
वैयक्तिक स्पर्धेत एकमेकींविरुद्ध भिडल्यानंतर आता पायल आणि शीतल महिला कंपाउंड संघ प्रकारात एकत्र खेळताना दिसतील. या गटाच्या अंतिम सामन्यात भारताचा सामना कझाकस्तानशी होणार आहे. दुसरीकडे, पुरुषांच्या कंपाउंड गटात श्याम सुंदर स्वामीने कांस्यपदकावर नाव कोरले. त्याने आपला वरिष्ठ सहकारी राकेश कुमार याला ‘शूट-ऑफ’ मध्ये पराभूत केले. दोघांचा स्कोअर १४३-१४३ असा बरोबरीत सुटल्यानंतर, शूट-ऑफमध्ये श्यामने १० गुण मिळवत बाजी मारली.


