Pavana Dam Water Level : शहरावर पाणी कपातीचे संकट? पवना धरणातील पाणीसाठा थेट ‘इतक्या’ टक्क्यांवर
Pavana Dam Water Level : जून अखेरपर्यंत पुरेल एवढाच साठा असल्याचा महापालिकेचा दावा; मान्सून खोळंबल्यास शहरात दिवसाआड पाणीपुरवठा होण्याची शक्यता.

Pavana Dam Water Level – पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारा मावळातील पवना धरणाचा जलसाठा वेगाने कमी होत आहे. धरणात केवळ २५ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, पाऊस लांबणीवर पडल्यास शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पिंपरी-चिंचवड शहरासह नगरपालिका, ग्रामपंचायत तसेच, एमआयडीसीला पवना धरणातून पाणी दिले जाते.
महापालिका पवना धरणातून सोडलेले पाणी पवना नदीवरील रावेत येथील बंधार्यातून उचलते. दररोत ५५० एमएलडी अशुद्ध पाणी उपसा करून ते प्राधिकरण, निगडी येथील सेक्टर क्रमांक २३ येथील जलशुद्धीकरण केंद्रात शुद्धीकरण प्रक्रिया करून संपूर्ण शहराला पुरवठा केल जातो. प्रचंड उष्णतेमुळे बाष्पीभवन होऊन पवना धरणातील पाणीसाठा वेगात कमी होत आहे. धरणात रविवारी केवळ २५ टक्के पाणी साठा शिल्लक होता.
धरणाचे पात्र मोठ्या प्रमाणात कोरडे पडत आहे. त्या भागातून गाळ काढून शेतकरी नेत आहेत. धरणातील पाणीसाठा पिंपरी-चिंचवड शहराला जून महिन्यापर्यंत पुरेल असा दावा महापालिकेच्या अधिकार्यांनी केला आहे. मात्र, पाऊस लांबणीवर पडल्यास शहराला पाणीटंचाईस सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे शहरातील नागरिकांनी उपलब्ध पाणी साठ्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन अधिकार्यांनी केले आहे.
आंद्रा धरणातील पाणी साठ्यातही घट
मावळ तालुक्यातील आंद्रा धरणात सध्या ३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. आंद्रा पाणी योजनेतून महापलिकेकडून निघोजे येथील इंद्रायणी नदी बंधार्यातून दररोज ९० एमएलडी पाणी उचलले जाते. ते पाणी अधिक दूषित असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे महापालिकेस पाणी शुद्धीकरणावर अधिकचा खर्च करावा लागत आहे.




