Water Scarcity: ऐन पावसाळ्यात पूर्व हवेलीत पाणीटंचाई! बेबी कालव्याचे पाणी बंद झाल्याने शेतकरी आक्रमक
Water Scarcity: पूर्व हवेलीतून जाणारा जुना (बेबी) कालवा बंद असल्याने पावसाळ्यातही शेतीचा पाणीप्रश्न गंभीर; परिसरातील पिके करपण्याची भीती.

Water Scarcity – पूर्व हवेलीतून जाणारा बेबी कालवा (जुना कालवा) बंद असल्याने ऐन पावसाळ्यात अनेक गावांत पाणी टंचाई जाणवू लागली असून ऐन पावसाळ्यात कालवा बंद असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. लोणी काळभोर, कुंजीरवाडी, आळंदी म्हातोबाची, सोरतापवाडी, शिंदवणे, उरुळी कांचन आदी गावांत शेतीला पाणीटंचाई जाणवू लागली आहे.
यावर्षी अनेक गावांत पावसाचे प्रमाण खुपच कमी आहे. पिकाला पाणी कमी पडू लागल्याने पिके जळून चाललेली आहेत. त्यासाठी लवकर जुन्या कालव्याला पाणी सोडावे, अशी मागणी पूर्व हवेलीतील शेतकऱ्यांनी केली आहे. बाजरी, मका, ऊस व फळभाजी, भाजीपाला लागवड असलेल्या पूर्व हवेलीचा पट्टा सध्या पाण्याअभावी जळून चालला आहे.
पिकांना नवसंजीवनी जर द्यायची असेल तर सध्या पाण्याची आवश्यकता आहे. त्यात ऑगस्ट महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस नाही. मागील वर्षी मे महिन्यापासुनच अतिवृष्टीला सुरुवात झाली होती. त्यामुळे सर्व पिके हातातून गेलेली होती. शेतकरी व शेतीपूरक व्यवसायाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. आता यावर्षी पाण्याअभावी पिके हातातून गेली तर शेतकरी पुन्हा अडचणीत येईल,
याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. अनेक गावांतील विहिरी व बोअरवेलमधील पाण्याची पातळी खालावली आहे. कालव्या शेजारील भागात पाणी कमी पडू लागले आहे. पेरणी झालेल्या बाजरी या पिकाला पाणी मिळत नसल्याने वाढ खुंटली आहे. ऊसाच्या लागणी थांबल्या असून टोमॅटोच्या लागणी सुद्धा कमी प्रमाणात झाल्या आहेत.
रोपांसाठी अडचणींचा डोंगर
पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, म्हातोबा आळंदी, कुंजीरवाडी, सोरतापवाडी, उरुळी कांचनपासून ते यवतपर्यंत कांद्याच्या लागवडी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर केल्या जातात. परंतु पाणी कमी पडल्याने रोपे तयार करण्यात अडचणी येऊ लागल्या आहेत. शेती दोन्ही कालव्यावर अवलंबून आहे.
नवा कालवा सुरू असून जुना कालवा बंद असल्याने शेतकरी अडचणी आले आहेत. कालव्याचा पाणी पुरवठा बंद केल्याने तसेच आता कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असल्यामुळे कांदा लागवडीची लगबग सुरू असून पाण्याअभावी कांद्याचा हंगाम वाया जाण्याची धास्ती शेतकऱ्यांमध्ये आहे.






