Pimpri-Chinchwad: पाणीपुरवठ्यासाठी २२० कोटींच्या कामांना मंजुरी; अंदाजपत्रक समितीची मान्यता
Pimpri-Chinchwad: आंद्रा पाणी योजनेला मिळणार गती

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहराची भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन महापालिकेने पाणीपुरवठा योजनांना गती देण्यास सुरुवात केली आहे. शहरासाठी आंद्रा धरणातून अतिरिक्त १०० एमएलडी (दशलक्ष लिटर) पाणी मिळणार आहे.
या पाणी योजनेच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेच्या अंदाजपत्रक समितीकडून २२० कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली आहे. या मंजुरीमुळे आता आवश्यक असणाऱ्या पायाभूत कामांसाठीची निविदा प्रक्रिया राबवली जाणार असून, प्रत्यक्ष कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या काही वर्षांत आयटी पार्क, गृहनिर्माण प्रकल्प आणि वाढत्या शहरीकरणामुळे शहराचा विस्तार झपाट्याने झाला आहे. साहजिकच, यामुळे पाण्याची मागणीही प्रचंड वाढली आहे. सध्या शहराला प्रामुख्याने पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो, परंतु वाढत्या लोकसंख्येमुळे हा पुरवठा अपुरा पडू लागला होता.
अनेक भागांत अपुऱ्या आणि विस्कळीत पाणीपुरवठ्याची समस्या निर्माण होत होती. या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने आंद्रा आणि भामा आसखेड धरणातून पाणी आणण्याचे नियोजन केले होते. त्यापैकी आंद्रा धरणातून आता अतिरिक्त १०० एमएलडी पाणी शहरात थेट बंदिस्त पाइपलाइनमधून आणण्याच्या योजनेला गती मिळणार आहे.
शहरासाठी सध्यस्थितीत पवना धरणातून ५२० एमएलडी, आंद्रा धरणातून १०० एमएलडी पाणी उचलले जात आहे. आंद्रा धरणाचे पाणी थेट बंदिस्त जलवाहिनीतून व जॅकवेलचे काम पूर्ण होईपर्यंत, महापालिका तळवडेजवळील निघोजे येथील इंद्रायणी नदीच्या बंधाऱ्यावरून तात्पुरत्या स्वरूपात दररोज ९५ एमएलडी (MLD) अशुद्ध पाणी उचलत आहे.
या पाण्यावर चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून ते शहरात पुरवले जात आहे. त्यामुळे आंद्रा धरणातून शुद्ध पाणी उचलण्यासाठी जॅकवेल उभारणीसाठी जलसंपदा विभागाने ९५ गुंठे जागा मंजूर केली आहे. महापालिकेकडून जॅकवेल आणि बंदिस्त जलवाहिनीचे काम पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी २२० कोटीची निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
याशिवाय, पिंपरी-चिंचवडची पाण्याची गरज भागवण्यासाठी भामा-आसखेड धरणातून आणखी १६७ एमएलडी पाणी आणण्याचे कामही मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.
निविदा प्रक्रिया लवकरच
महापालिकेच्या अंदाजपत्रक समितीकडून आंद्रा धरणातील बंदिस्त पाइपलाइन व जॅकवेलच्या कामाला मंजुरी मिळाल्यामुळे या प्रकल्पातील सर्वात मोठा प्रशासकीय अडथळा दूर झाला आहे. पाणीपुरवठा विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या कामांसाठीची निविदा प्रक्रिया येत्या काही दिवसांतच सुरू करण्यात येणार आहे.
पारदर्शक पद्धतीने निविदा प्रक्रिया पूर्ण करून, पात्र ठेकेदाराची नियुक्ती केली जाईल आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. महापालिका प्रशासनाचा हा प्रकल्प विहित मुदतीत पूर्ण करण्याचा मानस आहे.
PCMC News: महापालिकेच्या ‘कारभाऱ्यांची’ शाळा; फडणवीस-चव्हाण देणार नगरसेवकांना धडे





