Dimbhe Dam Water Level – आंबेगाव तालुक्यासाठी महत्त्वाचे मानले जाणारे हुतात्मा बाबू गेनू सागर अर्थात डिंभे धरण येथील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या धरणात सोमवार, दि.१८ रोजी १७.०६ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक असून गतवर्षी याच कालावधीत ७.६६ टक्के पाणी उपलब्ध होते. यंदा तुलनेने अधिक पाणीसाठा असला तरी वाढत्या तापमानामुळे जलपातळी वेगाने घटत असल्याने जलसंपदा विभाग सतर्क झाला आहे. शेती आणि पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन सध्या डिंभे धरणाच्या डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात आले आहे. तसेच उजव्या कालव्यालाही लवकरच पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने बाष्पीभवनाचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा योग्य नियोजनाने आणि काटकसरीने वापर करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, पाणीसाठा घटत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून आगामी काळात पावसाळा लांबल्यास पाणीटंचाईचा धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. “सध्या उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने कालव्यांना पाणी सोडले जात आहे. वाढत्या उष्णतेमुळे बाष्पीभवन वाढले असून नागरिक आणि शेतकऱ्यांनी पाण्याचा वापर अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करावा.” – गणेश नान्नोर,कार्यकारी अभियंता, कुकडी प्रकल्प. “उन्हामुळे पिकांना पाण्याची गरज वाढली आहे. सध्या धरणात पाणी असले तरी पातळी झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे कालव्याचे पाणी योग्य वेळेत मिळणे गरजेचे असून पाण्याचे नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे.” – वसंतराव पडवळ,माजी सरपंच, सविंदणे.