Iran Pakistan Airstrike : इराणने मंगळवारी पाकिस्तानमधील बलुचिस्तान भागातही क्षेपणास्त्रांचा मारा केला. या हल्ल्यामध्ये दोन लहान मुले ठार झाली. बलुचिस्तान प्रांतातील जैश अल अदी या दहशतवादी संघटनेच्या दोन तळांवर इराणने क्षेपणास्त्रांचा मारा केला होता. क्षेपणास्त्रांच्या माऱ्यात हे तळ पूर्णपणे उद्ध्वस्त केले गेले, असे इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
इराणने केलेल्या या हल्ल्यावरून पाकिस्तानने थयथयाट केला आहे. या हल्ल्याचे गंभीर परिणाम इराणला भोगावे लागतील, असे पाकिस्तानने म्हटले होते. त्यानंतर आता पाकिस्तानने इराणवर प्रतिहल्ला केला आहे. पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांनी इराणच्या सैन्याला लक्ष्य केले आहे. तसेच इराणच्या सीमेवरील इराणी अधिकाऱ्याची हत्या करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यामुळे इराण- पाकिस्तान यांच्यात युद्धाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, इराणने केलेल्या या हल्ल्यानंतर पाकिस्तानने इराणच्या दूतावास प्रभारींना परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात पाचारण केले आणि चांगले खडसावले. इराणने हवाई हद्दीचे उल्लंघन केल्याबद्दल कडक शब्दात निषेध देखील करण्यात आला, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते. यातच आता पाकिस्तानने देखील इराणला प्रत्युत्तर दिले आहे.
पाकिस्तानने इराणच्या बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट आणि बलुचिस्तान लिबरेशन आर्मीवर लक्ष्य केलं आहे. पाकिस्तानने इराणवर २० क्षेपणास्रे डागली असल्याची माहिती समोर आली आहे. यावरून आता इराण आणि पाकिस्तानमधील वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.