PAK vs ENG 1st Test : पाकच्या नावावर आणखी एक लाजिरवाणा विक्रम, अशी कामगिरी करणारा ठरला पहिला संघ…

PAK vs ENG 1st Test (Pakistan Cricket Team) : पाकिस्तान क्रिकेट संघाच्या कामगिरीत सुरू झालेली घसरण थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. फॉरमॅट कोणताही असो, समोर संघ कोणताही असो, पण पाकिस्तान प्रत्येक सामन्यात आणि घरच्या मैदानावर निराशाजनक कामगिरीचा स्वतःचाच विक्रम मोडत आहे. मुलतान कसोटीत इंग्लंडविरुद्धच्या पराभवामुळे पाकिस्तानच्या नावावर एक असा विक्रम जमा झाला आहे जो यापूर्वी कोणत्याही संघाच्या नावावर नव्हता.
पाकच्या नावावर लाजिरवाणा विक्रम…
मुलतान कसोटीत एक डाव आणि 47 धावांनी पराभव पत्करावा लागल्याने पाकिस्तान क्रिकेट संघ पहिल्या डावात 500 हून अधिक धावा करूनही डावाने पराभूत होणारा जगातील पहिला संघ बनला आहे. नुकतीच बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर पाकिस्तानसाठी हा मानहानीकारक पराभव आहे. मालिकेत अजून 2 कसोटी खेळायच्या आहेत. उर्वरित 2 सामन्यात संघ कशी कामगिरी करतो हे पाहणे बाकी आहे.
England win the first Test in Multan.#PAKvENG | #TestAtHome pic.twitter.com/PyFZFej9uv
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 11, 2024
सपाट खेळपट्टीवरही झाल्या नाहीत धावा…
पाकिस्तानचा संघ किती आउट ऑफ फॉर्म आहे, याचा त्याची दुसरी इनिंग पाहून अंदाज बांधता येतो. पहिल्या दोन डावात 1379 धावा झाल्या होत्या, तर दुसऱ्या डावात पाकिस्तान केवळ 220 धावांवरच मर्यादित राहिला. त्यातही सलमान आघाने 63 आणि आमेर जमालने नाबाद 55 धावा केल्या.
असा झाला सामना….
पहिल्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने पहिल्या डावात 556 धावा केल्या. पाकिस्तानकडून कर्णधार शान मसूदने 151, अब्दुल्ला शफीकने 102 आणि सलमान आगाने 104 धावा केल्या. प्रत्युत्तरात जो रूटच्या 262 धावा आणि ब्रूकच्या 317 धावांच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या डावात 7 बाद 823 धावांवर डाव घोषित करत 267 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात पाकिस्तानचा संघ 220 धावांवर गारद झाला आणि त्यांनी एक डाव आणि 47 धावांनी सामना गमावला.





