PAK vs ENG, 1st Test : मुलतानमध्ये इंग्लंडचा संघ ठरला सुलतान…! पाकिस्तानला एक डाव आणि 47 धावांनी चारली पराभवाची धूळ…

ENG vs PAK 1st Test Match Result : पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना मुलतान क्रिकेट स्टेडियमवर पार पडला. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा एक डाव आणि 47 धावांनी पराभव केला आहे.
पाकिस्तानने पहिल्या डावात 556 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने सात विकेट्सवर 823 धावा करून पहिला डाव घोषित केला. त्यांच्याकडे 267 धावांची आघाडी होती. प्रत्युत्तरात चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पाकिस्तानने दुसऱ्या डावात सहा गडी गमावून 152 धावा केल्या होत्या. त्यानंतर शुक्रवारी पाचव्या दिवशी पाकिस्तानचा डाव 220 धावांवर गारद झाला. गुरुवारच्या धावसंख्येत संघाला केवळ 68 धावांची भर घालताना उर्वरित चार विकेटसह सामनाही गमावला.
या विजयासह इंग्लंड संघानं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेती पुढील सामना 15 ऑक्टोबरपासून मुलतानमध्ये होणार आहे. पाकिस्तान संघाचा कसोटीतील हा सलग सहावा पराभव आहे. इंग्लंडच्या आधी ऑस्ट्रेलियाने या संघाचा सलग तीन कसोटीत पराभव केला होता तर त्यानंतर बांगलादेशने या संघाचा सलग दोन कसोटीत पराभव केला होता. त्याचबरोबर पाकिस्तानने घरच्या मैदानावर सलग तिसरी कसोटी गमावली आहे.
England win the first Test in Multan.#PAKvENG | #TestAtHome pic.twitter.com/PyFZFej9uv
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 11, 2024
पाकिस्तानचा दुसरा डाव….
पाकिस्तानचा दुसरा डाव पाचव्या दिवशी 54.5 षटकांत 220 धावांवर आटोपला. शुक्रवारी, पाचव्या दिवशी, संघाने सहा विकेट्सवर 152 धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली आणि 68 धावांची भर घालताना चार विकेट गमावल्या. पाकिस्तानला पाचव्या दिवशी पहिला धक्का आगा सलमानच्या रूपाने बसला. सलमानने सातव्या विकेटसाठी आमिर जमालसोबत 109 धावांची भागीदारी केली. तो 84 चेंडूंत सात चौकारांच्या मदतीने 63 धावा करून बाद झाला. जमालने कसोटी कारकिर्दीतील दुसरे अर्धशतक झळकावले. तो 55 धावांवर नाबाद राहिला, पण दुसऱ्या टोकाकडून विकेट पडत राहिल्या. शाहीन आफ्रिदी 10 तर नसीम शाह 06 धावा करून बाद झाला. अबरार अहमद दुखापतीमुळे खेळे शकला नाही आणि त्यामुळे पाकिस्तान संघ केवळ 220 धावाच करू शकला. याआधी गुरुवारी पाकिस्तानच्या एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या करता आली नाही. अब्दुल्ला शफीक खाते उघडू शकला नाही. त्याचवेळी सॅम अयुब 25 धावा , कर्णधार शान मसूद 11 धावा, बाबर आझम 5 धावा , सौद शकील 29 धावा आणि मोहम्मद रिझवान 10 धावा करून बाद झाला. इंग्लंडकडून गोलंदाजीत जॅक लीच याने सर्वाधिक 4 बळी घेतले. याव्यतिरिक्त गस ऍटकिन्सन आणि ब्रायडन कार्सने प्रत्येकी दोन गडी बाद केले. त्याचवेळी ख्रिस वोक्सला एक विकेट मिळाली.
पाकचा पहिला डाव 556 वर संपुष्टात…
सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्तानचा पहिला डाव 149 षटकांत 556 धावांवर आटोपला होता. यादरम्यान पहिल्या डावात पाकिस्तानकडून 8व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या आघा सलमानने शतक झळकावले, तर त्याच्याआधी कर्णधार शान मसूद आणि सलामीवीर फलंदाज अब्दुल्ला शफीक यांनीही शतके झळकावली होती. सलमान आघाने 119 चेंडूत 104 धावांची शतकी खेळी खेळली. तर कर्णधार शान मसूदने 151 तर अब्दुल्ला शफीकने 102 धावा केल्या. या सामन्यात बाबर आझमची बॅट चालली नाही आणि त्याने 81 चेंडूत 33 धावांची खेळी केली. इंग्लंडकडून जॅक लीचने सर्वाधिक 3 बळी घेतले. लीच व्यतिरिक्त इंग्लंडकडून गस ऍटकिन्सन आणि ब्रायडन कार्सने प्रत्येकी दोन, तर ख्रिस वोक्स, शोएब बशीर आणि रूट यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
इंग्लंडची पहिल्या डावात विक्रमी धावसंख्या…
पहिल्या डावात इंग्लंडच्या जो रूट आणि हॅरी ब्रूक यांनी पाकिस्तानी गोलंदाजांना घाम फोडला आणि संघाची धावसंख्या 800 पार नेली होती. इंग्लंडने आपला पहिला डाव सात बाद 823 धावांवर घोषित केला होता. ही कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील ही चौथी सर्वोच्च धावसंख्या ठरली. तसेच इंग्लंड कसोटी क्रिकेटमध्ये तीन वेळा 800 किंवा त्याहून अधिक धावा करणारा पहिला संघ ठरला. इंग्लंडकडून हॅरी ब्रूकने 322 चेंडूत 29 चौकार अन् 3 षटकारासह सर्वाधिक 317 धावांची खेळी केली. यासह ब्रूक इंग्लंडकडून कसोटीत त्रिशतक झळकावणारा सहावा फलंदाज ठरला. तसेच पाकिस्तानविरुद्ध त्रिशतक झळकावणारा तो पाचवा फलंदाज ठरला. जो रूटने देखील दुहेरी शतक लगावले. त्यानं 375 चेंडूत 17 चौकारासह 262 धावा केल्या. याव्यतिरिक्त जॅक क्रॉलीने 85 चेंडूत 13 चौकारांच्या मदतीने 78 धावांची तर बेन डकेटने 75 चेंडूत 11 चौकारांच्या मदतीने 84 धावांची खेळी केली. यादरम्यान पाकिस्तानकडून पहिल्या डावात नसीम शाह आणि सॅम अयुबने प्रत्येकी 2 बळी घेतले. तर शाहीन शाह आफ्रिदी ,आमेर जमाल आणि आगा सलमानने प्रत्येकी 1 बळी घेतला.





