PAK vs ENG : पाकिस्तानच्या अडचणीत वाढ! इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी ‘पिच’बाबत ICC चा मोठा निर्णय; सेमीफायनलचं स्वप्न भंगणार?
PAK vs ENG :

ICC fresh pitch decision for PAK vs ENG Super 8 match : टी-२० विश्वचषक २०२६ च्या ‘सुपर-८’ फेरीतील पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील सामना आता पाकिस्तानसाठी ‘करो या मरो’ असा झाला आहे. पल्लेकेले येथे होणारा हा सामना पाकिस्तानसाठी स्पर्धेतील शेवटचा सामना ठरू शकतो. कारण या सामन्यातील पराभवामुळे पाकिस्तानचे उपांत्य फेरीतील आव्हान संपुष्टात येईल. मात्र, या सामन्यापूर्वी आयसीसीच्या एका निर्णयाने पाकिस्तानच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
नव्या खेळपट्टीचा इंग्लंडला फायदा?
आयसीसीने पल्लेकेले येथील या महत्त्वाच्या सामन्यासाठी ताजी आणि नवी खेळपट्टी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. ताज्या खेळपट्टीचा अर्थ असा की, २२ गजांच्या या पट्टीवर अधिक जिवंतपणा असेल, ज्यामुळे वेगवान गोलंदाजांना चांगला स्विंग आणि बाऊन्स मिळेल. इंग्लंडचे खेळाडू अशा खेळपट्ट्यांवर खेळण्यासाठी तरबेज आहेत, तर पाकिस्तानी फलंदाज अशा उसळत्या खेळपट्ट्यांवर अडखळण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानच्या फिरकी ताकदीला बसणार खिळ?
या विश्वचषकात आतापर्यंत फिरकी गोलंदाजी ही पाकिस्तानची मोठी ताकद राहिली आहे. त्यांच्याकडे उस्मान तारिक, शादाब खान, मोहम्मद नवाज आणि सैम अयुब यांसारखे दर्जेदार फिरकीपटू आहेत. मात्र, पल्लेकेलेची खेळपट्टी जर वेगवान गोलंदाजांना मदत करणारी ठरली, तर पाकिस्तानची ही फिरकीची रणनीती अपयशी ठरू शकते. पाकिस्तानी वेगवान गोलंदाज सध्या चांगल्या फॉर्ममध्ये नसल्यामुळे इंग्लंडचे पारडे जड मानले जात आहे.
पराभव म्हणजे स्पर्धेतून ‘एक्झिट’ –
पाकिस्तानसाठी ही खेळपट्टी ‘गळ्यातील हाड’ बनण्याची शक्यता आहे. सुपर-८ मधील पाकिस्तानचा पहिला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द झाला होता, ज्यामुळे त्यांना केवळ १ गुण मिळाला आहे. आता इंग्लंडविरुद्ध पराभव झाल्यास पाकिस्तानचे एकूण गुण इतके कमी राहतील की, शेवटचा सामना जिंकूनही त्यांना उपांत्य फेरीत पोहोचणे अशक्य होईल. थोडक्यात सांगायचे तर, इंग्लंडविरुद्धची हार म्हणजे पाकिस्तानचा विश्वचषकातील गाशा गुंडाळला जाण्यासारखेच आहे.






