PAK vs AUS : पाकिस्तानचा ऐतिहासिक विजय! तब्बल ८ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाचा टी-२० क्रिकेटमध्ये उडवला धुव्वा
PAK vs AUS : पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाविरुद्ध गेल्या ८ वर्षांपासून विजयाची असलेली प्रतीक्षा संपवली आहे

PAK vs AUS Pakistan victory after 8 years : पाकिस्तान क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या टी-२० मालिकेत विजयाचा श्रीगणेशा केला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने यजमान ऑस्ट्रेलियावर २२ धावांनी दिमाखदार विजय मिळवला. या विजयासोबतच पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाविरुद्ध गेल्या ८ वर्षांपासून विजयाची असलेली प्रतीक्षा संपवली आहे. ऑक्टोबर २०१८ नंतर टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात पाकिस्तानने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाला पराभूत केले असून, सलग ९ पराभवांची मालिका मोडीत काढली आहे.
पहिल्या चेंडूवर धक्का, तरीही आव्हानात्मक धावसंख्या –
सामन्याच्या सुरुवातीलाच पाकिस्तानला मोठा धक्का बसला. सलामीवीर साहिबझादा फरहान पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला. मात्र, त्यानंतर सैम अयूब आणि सलमान अली आगा यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७४ धावांची महत्त्वाची भागीदारी करत डावाला सावरले. या सामन्यात बाबर आझम चौथ्या आणि फखर झमान पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला, मात्र दोघेही मोठी खेळी करू शकले नाहीत. ऑस्ट्रेलियाकडून अॅडम झाम्पाने २४ धावांत ४ विकेट्स घेत पाकिस्तानला १६८ धावांवर रोखले.
पाकिस्तानी फिरकीपटूंचा ‘स्पिन’ अटॅक –
प्रत्युत्तरात १६९ धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली होती. ट्रॅव्हिस हेडने १३ चेंडूत २३ धावा कुटल्या, पण तो बाद झाल्यावर ऑस्ट्रेलियन फलंदाजी कोलमडली. मिचेल मार्शच्या अनुपस्थितीत मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला पाकिस्तानी फिरकीपटूंनी आपल्या जाळ्यात अडकवले.
L L L L L L L 𝗪*
After 7 long years
Pakistan Defeated Australia in T20I#PAKvsAUS pic.twitter.com/WsPszbmimT— 𝑺𝒉𝒆𝒃𝒂𝒔 (@Shebas_10dulkar) January 29, 2026
शादाब खान, सैम अयूब, अबरार अहमद आणि मोहम्मद नवाझ या फिरकीपटूंनी मिळून ११ षटकांत केवळ ६० धावा दिल्या आणि ४ महत्त्वाचे विकेट्स घेतले. कॅमेरून ग्रीनने ३६ तर जेवियर बार्टलेटने नाबाद ३४ धावा केल्या, पण तरीही ऑस्ट्रेलियाला २० षटकांत केवळ १४६ धावांपर्यंतच मजल मारता आली.
मालिकेत १-० ची आघाडी –
पाकिस्तानचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय
पाकिस्तानने हा सामना २२ धावांनी जिंकून मालिकेत १-० अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे. कांगारूंच्याच भूमीवर त्यांना हरवून पाकिस्तानने आपल्या टी-२० वर्ल्ड कपच्या तयारीचा जोरदार इशारा दिला आहे. आता दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया कमबॅक करणार की पाकिस्तान मालिका खिशात घालणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





