Tamim Rahman : क्रिकेट विश्वात खळबळ! फिक्सिंग प्रकरणी ‘दांबुला थंडर्स’च्या मालकाला ४ वर्षांची शिक्षा
Tamim Rahman : मॅच फिक्सिंग प्रकरणी तमीम रहमानला न्यायालयाने दोषी ठरवून चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

Tamim Rahman four years sentence for fixing : लंका प्रीमियर लीग (LPL) मधील मॅच फिक्सिंग प्रकरणाचा निकाल लागला असून, दांबुला थंडर्स या संघाचा मालक तमीम रहमान याला न्यायालयाने दोषी ठरवून चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच त्याच्यावर ५ वर्षांची बंदी आणि २४ दशलक्ष श्रीलंकन रुपये (सुमारे २.४ कोटी रुपये) इतका मोठा दंडही ठोठावण्यात आला आहे.
तमीम रहमानने मान्य केला गुन्हा –
बांगलादेशी वंशाच्या तमीम रहमानवर सट्टेबाजीचे रॅकेट चालवणे आणि एका खेळाडूला फिक्सिंगसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप होता. न्यायालयात तमीमने आपले सर्व आरोप मान्य केले आहेत. त्याने कबूल केले की, टूर्नामेंट दरम्यान त्याने सट्टेबाजीचे नियोजन केले होते आणि फिक्सिंग संदर्भात एका खेळाडूशी संपर्कही साधला होता. दरम्यान, तमीमची ही शिक्षा निलंबित (Suspended) राहणार आहे.
विमानतळावरून झाली होती अटक –

मॅच फिक्सिंग प्रकरणी तमीम रहमानला चार वर्षांची शिक्षा
तमीम रहमानने हा कट रचल्यानंतर तो दुबईला पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र, ज्या खेळाडूशी त्याने संपर्क साधला होता, त्याने तातडीने भ्रष्टाचारविरोधी पथकाला याची माहिती दिली. या माहितीच्या आधारे कोलंबो विमानतळावर सापळा रचून रहमानला अटक करण्यात आली. या प्रकरणात दांबुला संघाचा मॅनेजर मुजीब उर रहमान (पाकिस्तानी नागरिक) याच्याविरुद्धही अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.
श्रीलंकेचा कडक भ्रष्टाचार विरोधी कायदा –
श्रीलंकेने २०१९ मध्ये क्रीडा क्षेत्रातील भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर कायदा लागू केला होता. या कायद्यानुसार शिक्षा होणारा तमीम रहमान हा मोठा क्रिकेट प्रशासक ठरला आहे. या कारवाईमुळे क्रिकेटमधील फिक्सिंग रॅकेटवर मोठा प्रहार करण्यात आला आहे.
लंका प्रीमियर लीग –
लंका प्रीमियर लीग ही स्पर्धे २०२० पासून श्रीलंकेत खेळली जात आहे. या लीगमध्ये श्रीलंकेतील पाच शहरांच्या नावावर आधारित ५ संघ खेळतात. जाफना किंग्स हा या लीगचा सर्वात यशस्वी संघ असून त्यांनी आतापर्यंत ४ वेळा विजेतेपद पटकावले आहे.





