Chiranjeevi Padma Vibhushan : दाक्षिणात्य चित्रपटातील सुपरस्टार अभिनेते चिरंजीवी यांनी त्यांच्या अभियाने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. साऊथचा मेगास्टार चिरंजीवी यांचा मोठा चाहता वर्ग आहे. अभिनयातील त्यांच्या कारकीर्दीसाठी भारतातील सर्वोच्च पुरस्कारांपैकी एक असणाऱ्या पद्मविभुषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यानंतर त्यांच्यावर सेलिब्रिटींसह चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर चिरंजीवी यांनी भावूक प्रतिक्रिया दिली आहे.
चिरंजीवी यांनी ट्वीटर (एक्स) वर कला क्षेत्रातील ज्या मान्यवरांना पद्म भूषण आणि पद्मविभुषण पुरस्कारांनी गौरविण्यात आले त्यांच्या नावांचा उल्लेख करत त्यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांनी स्वत: चा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. ज्यात ते म्हणतात की, “खरं तर मी हा पुरस्कार मिळाल्यानंतर खूपच भावूक झालो आहे. हा माझ्यासाठी खूपच मोठा क्षण आहे. मी माझ्या चाहत्यांचे, मित्रांचे आणि माझ्या परिवाराचे सगळ्यांचे आभार मानतो. यात त्यांचे योगदान खूपच मोठे आहे. मला माहिती आहे मी जे आभार मानतो आहे ते पुरेसे नाहीत पण मी नेहमीच सगळ्यांप्रती कृतज्ञ राहण्याचा प्रयत्न केला आहे”
🙏🙏🙏 pic.twitter.com/4PDaCV2kzv
— Chiranjeevi Konidela (@KChiruTweets) January 25, 2024
पुढे ते म्हणाले, “यापुढील काळात देखील मी अधिक उर्जेनं चाहत्यांचे मनोरंजन करण्याचा आणि त्या क्षेत्रात मोठे योगदान देण्याचा मी प्रयत्न करेन. तसेच समाजातील विविध क्षेत्रातील व्यक्तींना मदत करण्यासाठी मी पुढाकार घेईन असेही चिरंजीवी यांनी म्हटले आहे. मी आतापर्यत जे काही केले आहे ते खूपच कमी आहे. त्यातून मला जी प्रसिद्धी मिळाली त्यात मी माझे भाग्य समजतो.”
यावेळी चिरंजीवी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देखील आभार मानले. “मी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, भारतीय सरकार यांचे मनापासून आभार मानतो. त्यांनी मला पद्मविभुषण पुरस्कारासाठी योग्य समजले त्याबद्दल. धन्यवाद, जय हिंद…” असे म्हणत चिरंजीवी यांनी आपली भावना व्यक्त केली.